
राज्यात एकाचवेळी झालेल्या ‘महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’ला राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तीन लाखांहून अधिक नागरिकांच्या सहभागातून जलसंधारणाचा संदेश महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. हा केवळ शासनाचा विषय नसून प्रत्येक नागरिकाच्या भवितव्याशी निगडित विषय आहे. या उपक्रमाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा महाराष्ट्रातील जनतेची जलसंधारणाबाबतची जागरूकता आणि सहभागाची भावना अधोरेखित करणारा आहे, असे मत मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केले.
मुंबईतील वरळी येथे या उपक्रमाला सुरुवात झाली. त्याचवेळी राज्यभरातील विद्यार्थी, युवक, महिला, शेतकरी, कर्मचारी, महाविद्यालयीन तरुणाई तसेच विविध सामाजिक घटकांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. राज्यात ‘जलयुक्त शिवार अभियान २.०’, ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’, ‘अमृत सरोवर’, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आदी विविध माध्यमांतून जलसंधारणाच्या कामांमध्ये लोकसहभाग वाढविण्यासाठी ‘वॉक फॉर वॉटर’ प्रभावी माध्यम ठरले आहे.
१५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत राज्यात ‘जलसंधारण अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून गावागावांत पाणलोट विकास, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन, गाळ काढणे, भूजल पुनर्भरण आणि मृदसंवर्धनाच्या कामांना गती देण्यासोबतच अभियानादरम्यान काही निवडक गावांमध्ये जलशोषक खड्डे तयार करण्याचे उद्दिष्ट देण्यात येणार आहे. ‘वॉक फॉर वॉटर’मधून महाराष्ट्राने दिलेला संदेश आता प्रत्यक्ष कृतीत उतरवून जलसंधारणाची लोकचळवळ अधिक व्यापक करूया,’ असेही मंत्री राठोड यांनी आवाहन केले.