मुंबई: तंत्रज्ञानाचा अंतिम उद्देश हा सामान्य नागरिकांचे जीवन सुलभ करणे आहे. सर्वसामान्य माणूस हाच आपला ‘विठ्ठल’ असून त्याच्या सेवेसाठीच टेक वारी आहे. केवळ तंत्रज्ञान नव्हे तर मानवी संवेदना, मानसिक आरोग्य, आत्मपरीक्षण “आर्ट ऑफ हँडलिंग क्रिटिसिझम” विषयही प्रशासनासाठी महत्त्वाचा आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या ‘टेक वारी’ उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात नागरिक-केंद्रित प्रशासनाचा वेगवान रोडमॅप राबविला जात असून तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शासन अधिक कार्यक्षम आणि सुलभ करण्यावर भर दिला जात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मंत्रालयातील त्रिमुर्ती प्रांगणात सामान्य प्रशासन विभागातर्फे आयोजित ‘टेक-वारी २.०’ अंतर्गत ‘महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताह कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, केंद्र सरकारच्या क्षमता बांधणी आयोगाच्या अध्यक्ष राधा चौहान, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही.राधा उपस्थित होते. कार्यक्रमास विविध विभागाचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, प्रशासनात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नागरिकांचे जीवन अधिक सुलभ करण्यासाठी ‘टेक वारी’ हा उपक्रम आहे. ‘टेक वारी’ ही संकल्पना वारीच्या सातत्यपूर्ण परंपरेप्रमाणेच प्रेरणादायी आहे. जसे वारकरी कोणत्याही परिस्थितीत पंढरपूरची वारी चुकवत नाहीत, तसेच आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात सातत्याने शिकणे अत्यावश्यक आहे. तंत्रज्ञान दररोज बदलत असून, ते आपण जर स्वीकारले नाही तर व्यक्ती काळाच्या ओघात मागे पडू शकतात. अक्षरज्ञानापासून इंटरनेटपर्यंत साक्षरतेची व्याख्या विकसित झाली असून आता ती एआयपर्यंत पोहोचली आहे. ‘ज्याला एआय समजते आणि वापरता येते, तोच खऱ्या अर्थाने आज साक्षर आहे’ असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, एआयमुळे नोकरीच्या स्वरूपात मोठे बदल होणार असून, पुढील एक हजार दिवसात ८० ते ९० टक्के कामकाजाचे स्वरूप बदलू शकते, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.तंत्रज्ञानाला घाबरण्याऐवजी ते स्वीकारण्याची गरज अधोरेखित करताना त्यांनी संगणक क्रांतीचे उदाहरण दिले. संगणकामुळे कार्यक्षमता आणि पारदर्शकता वाढली, तसेच मोठ्या प्रमाणात सकारात्मक बदल झाले.’आयगॉट’प्लॅटफॉर्मद्वारे राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण घेतल्याचा उल्लेख करत त्यांनी अभिमान व्यक्त केला. विशेषतः एआय आणि आधुनिक तंत्रज्ञान विषयांबाबत अधिकाऱ्यांनी दाखवलेली उत्सुकता ही सकारात्मक बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. विविध विभागांनी एआय आणि ब्लॉकचेनसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ही क्षमता योग्य प्रकारे वापरली, तर महाराष्ट्र इतर राज्यांना मार्गदर्शन करू शकणारी कन्सल्टिंग क्षमता विकसित करू शकतो. एआय एजंट “वासुदेव” अत्यंत कार्यक्षम पद्धतीने काम करतात, त्यामुळे भविष्यात त्यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी आपल्यालाही स्वतःची कौशल्ये सातत्याने अद्ययावत ठेवावी लागतील.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या की, वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सतत शिकत राहणे आवश्यक आहे. “’टेक-वारी २.०”मधून केवळ तांत्रिक ज्ञान नव्हे, तर आत्मविकास, कार्यक्षमता आणि आधुनिक दृष्टिकोन विकसित करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.वारकऱ्यांची पंढरपूरकडे जाणारी वारी जशी शिस्त, श्रद्धा आणि एकात्मतेचे प्रतीक आहे, त्याचप्रमाणे “टेक वारी” ही प्रशासनाची तंत्रज्ञानाकडे वाटचाल दर्शवणारी चळवळ आहे. भविष्यात नागरिक-केंद्रित आणि सक्षम शासन घडवण्यासाठी ही वारी महत्त्वाची ठरणार आहे.
मागील वर्षीच्या “टेक वारी” उपक्रमाने तंत्रज्ञानाबाबत जागरूकतेचा भक्कम पाया घातला असून, हा उपक्रम केवळ तंत्रज्ञानाची ओळख नसून, मानव संसाधन विकासाची व्यापक चळवळ आहे.महाराष्ट्राने “साधना सप्ताह” उपक्रमात देशात प्रथम क्रमांक मिळवल्याचा उल्लेख करत त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच, मिशन कर्मयोगी अंतर्गत दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणामध्ये महाराष्ट्र देशातील अव्वल राज्यांमध्ये असल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला.डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे शासन आणि नागरिकांमधील संवाद अधिक सोपा झाला असून, एआयमुळे सेवा वितरण आणि तक्रार निवारण प्रक्रियेत मोठे बदल घडत असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सांगितले.
मुख्य सचिव राजेश अग्रवाल म्हणाले, टेक वारी उपक्रमात ‘लेफ्ट ब्रेन’ आणि ‘राईट ब्रेन’ या दोन्हींच्या विकासावर भर देण्यात आला आहे. तंत्रज्ञान, एआय, भाषा आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट यांसारख्या विषयांद्वारे विश्लेषणात्मक क्षमतेचा विकास केला जात असून, संगीत, योग, नृत्य आणि संस्कृतीसारख्या उपक्रमांमधून सर्जनशीलता आणि मानसिक स्वास्थ्य वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्राचीन काळातील ‘पुष्पक विमान’ ही संकल्पना आजच्या एआय-सक्षम आणि स्वयंचलित तंत्रज्ञानाचीच उदाहरण आहे. सायबर सुरक्षा आणि डिजिटल सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. “टेक वारी २.०”च्या माध्यमातून या सर्व विषयांवर सखोल चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अपर मुख्य सचिव व्ही.राधा प्रास्ताविकात म्हणाल्या की, ‘टेक-वारी २.०’ या प्रशिक्षण उपक्रमात ६ हजार कर्मचारी प्रत्यक्ष सहभागी होत आहेत. तसेच या कार्यक्रमांचे राज्यभरातील नऊ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक सत्राचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. या पाच दिवसांच्या कार्यक्रमात मंत्रालयात डिजिटल गव्हर्नन्स, डीपीडीपी कायदा, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, क्वांटम कॉम्प्युटिंग, जनरेटिव्ह एआयचा प्रत्यक्ष अनुभव, सायबर सुरक्षा, प्रशासनातील नीतिमत्ता तसेच केंद्र सरकारच्या प्लॅटफॉर्म्स या विषयांवर तज्ज्ञांची सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. या पाच दिवसांत ‘तालरंग’, ‘नादरंग’, ‘योगरंग’, ‘कलारंग’ आणि ‘संस्कृतीरंग’ असे पाच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत असे त्यांनी सांगितले.
एआय एजंट वासुदेव हा नाविन्यपूर्ण प्रयोग या कार्यक्रमात वापरण्यात आला.एआय एजंटने प्रेक्षकांशी संवाद साधला व त्यांनी कार्यक्रमाची पूर्ण माहिती प्रेक्षकांना दिली. टेक वारीच्या स्मरणिकेचे ही स्वरूपात प्रकाशन करण्यात आले.
फ्रंट लाईन कर्मचारी यांचा गौरव यावेळी मंत्रालयातील फ्रंट लाईन कर्मचारी पल्लवी सतीश सावंत,नितीन गुरसाळे, मारुती मदने, रेश्मा जाधव, राहुल वाघमारे, अशोक जाधव, प्रतीक गायकरवाड, संजय कळमरकर यांचा सत्कार करण्यात आला. ‘तालरंग’च्या कलाकारांचा सत्कार करण्यात आला.
टेक वारी अंतर्गत ‘टेक वारी तालरंग’ कार्यक्रमात अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतला नादमाधुर्याचा आनंद
मुंबई : सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने आयोजित टेक–वारी २.० अंतर्गत ‘महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताह’ कार्यक्रमात ‘टेक वारी तालरंग’ या वाद्यांच्या कार्यक्रमाने मंत्रालयातील अधिकारी–कर्मचाऱ्यांना मंत्रमुग्ध केले. अधिकारी–कर्मचाऱ्यांनी ढोलकी, संबळ या वाद्यांच्या स्वरनादाचा आनंद घेतला.
मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित तालरंग कार्यक्रमाच्या माध्यमातून ढोलकी–संबळच्या ठेक्यांनी परिसर दणाणून गेला. कलाकार निलेश परब (ढोलकी–संबळ वादक) आणि कृष्णा मुसळे (ढोलकी वादक) यांनी आपल्या सादरीकरणातून तालरंगाची रंगत अधिक खुलवली.तालरंग कार्यक्रमाची सांगता निलेश परब आणि कृष्णा मुसळे यांच्या ढोलकी वादनाच्या जुगलबंदीने झाली. या जुगलबंदीस उपस्थित अधिकारी–कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त दाद दिली.
टेक वारी २.० या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी उपस्थित मान्यवरांचे स्वागत टाळ्यांच्या गजरात करण्यात आले. तसेच तालरंगची सुरुवात गणपती वंदनेने करण्यात आली. या कार्यक्रमात ढोलकी, ढोल, संबळ, बासरी आदी वाद्यांच्या सहाय्याने गोंधळगीत व कोळीगीतांचे सादरीकरण करून उपस्थितांचे मनोरंजन करण्यात आले.
तालरंग या कार्यक्रमास मंत्रालयातील विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात जनगणना संचालनालयाचे सहसंचालक संतोष नरसिंह पायस यांची विशेष मुलाखत
मुंबई: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमांमध्ये जनगणना संचालनालयाचे सहसंचालक संतोष नरसिंह पायस यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. “जनगणना २०२७ ची तयारी” या विषयावर आधारित या मुलाखतीत जनगणनेचे राष्ट्रीय विकासातील महत्त्व, आगामी जनगणना प्रक्रियेचे नियोजन, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर तसेच नागरिकांचा सहभाग याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
‘दिलखुलास’ कार्यक्रमांतर्गत ही मुलाखत दि. ५ ते ९ मे २०२६ या कालावधीत दररोज सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर तसेच ‘न्यूज ऑन AIR’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होईल. तसेच ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात या मुलाखतीचा पहिला भाग मंगळवार, दि. १२ मे २०२६ रोजी रात्री ८.०० वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर आणि महासंचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्रेक्षकांना पाहता येणार आहे. ही मुलाखत निवेदक राजेंद्र हुंजे यांनी घेतली आहे.
भारतातील जनगणना ही केवळ लोकसंख्येची मोजणी नसून देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि विकासात्मक धोरणांना दिशा देणारी अत्यंत महत्त्वाची प्रशासकीय प्रक्रिया असल्याचे पायस यांनी यावेळी स्पष्ट केले. जनगणनेतून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे शासन विविध योजना आखते, संसाधनांचे नियोजन करते तसेच विकासाच्या प्राधान्यक्रमांना दिशा मिळते, असे त्यांनी सांगितले. या मुलाखतीत जनगणना २०२७ ही पूर्वीच्या जनगणनांपेक्षा अधिक तंत्रज्ञानाधारित आणि नागरिकाभिमुख कशी असेल, याची माहिती देण्यात आली आहे. “आमची जनगणना, आमचा विकास” या संकल्पनेमागील उद्दिष्ट स्पष्ट करताना त्यांनी नागरिकांचा सक्रिय सहभाग हीच यशस्वी जनगणनेची गुरुकिल्ली असल्याचे नमूद केले.
१ मे २०२६ पासून सुरू होणाऱ्या जनगणना प्रक्रियेचा आराखडा, घरगणना आणि लोकसंख्या गणना हे टप्पे, स्व-गणना (Self Enumeration) आणि प्रगणकाद्वारे घरभेटीची प्रक्रिया याविषयीही त्यांनी मार्गदर्शन केले. अधिकृत पोर्टलवर नोंदणी, लॉग-इन प्रक्रिया, OTP पडताळणी, भाषा निवड, SE ID चे महत्त्व तसेच नागरिकांनी स्व-गणना करताना घ्यावयाची काळजी याविषयी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
पंढरपूर तीर्थक्षेत्राचा समग्र विकास येत्या ३० महिन्यांत पूर्ण करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत 4150.46 कोटीच्या सर्वसमावेशक आराखड्यास मान्यता देण्यात आली. पंढरपूर हे राज्यातील सर्व धर्मियांचे श्रध्दास्थान आहे. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या भाविकास आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात. पुढील 50 वर्षाचा विचार करुन या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी करण्यात येणारी विकास कामे येत्या 30 महिन्यात पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.
‘सेल्फी’ साठी कनेक्टिंग लिंकवर थांबू नका; सीसीटीव्हीची २४x७ नजर राहणार
मुंबई: यशवंतराव चव्हाण मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंक (मिसिंग लिंक) लोकार्पणानंतर वाहतुकीसाठी सुरू करण्यात आली आहे. मात्र, प्रवासादरम्यान सेल्फी, फोटो, घेण्यासाठी वाहन चालक केबल स्टेड ब्रिज व बोगद्याजवळ वाहने थांबवत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. द्रुतगती मार्गावर वाहने थांबवण्यास परवानगी नसून वाहनधारकांसाठी अपघाताचा धोका असल्याने ते टाळावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्यावतीने करण्यात येत आहे.
महाराष्ट्र दिनी रोजी यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे मार्गावरील कनेक्टिंग लिंक अर्थात मिसिंग लिंकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण झाले.
महामार्ग पोलिसांनी अधिसूचनेद्वारे मुंबई-पुणे कनेक्टिंग लिंक प्रकल्पासाठी वेग मर्यादा जाहीर केली आहे. तसेच बोगद्यात हलक्या मोटार वाहनांसाठी ताशी १०० किमी वेग मर्यादा आणि बस व प्रवासी वाहनांसाठी ताशी ८० किमी वेग निश्चित केला आहे. कनेक्टिंग लिंक प्रकल्पातील दोन बोगदे व दोन पुलावर पूर्णपणे २४x७ सीसीटीव्ही यंत्रणेचे लक्ष आहे. यावर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष असून द्रुतगती मार्गावर थांबणाऱ्या गाड्यांची माहिती महामार्ग पोलिसांना दिली जाणार आहे.
सेल्फी, फोटो आणि रिल काढण्यासाठी थांबू नका, नाहीतर मोठ्या दंडाची आकारणी होऊ शकते. तसेच तुमच्यासह इतरांच्याही वाहनांना धोका होऊ शकतो. या कारणास्तव, नियमांचे पालन करा आणि सुरक्षित, सुखकर प्रवास करा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.
नसरापूर अत्याचार प्रकरणी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग सक्रिय
मुंबई: पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेची महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. आयोगाच्या सदस्या शुभांगी तांबट यांनी आज सकाळी पीडित बालिकेच्या घरी भेट देऊन तिचे पालक व नातेवाईकांशी संवाद साधला. यावेळी आयोगाच्या वतीने कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करण्यात आल्या.
पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आयोग सक्रिय झाला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच आयोगाने पोलीस प्रशासनाकडून तपशील मागवून चौकशीला सुरुवात केली आहे. दरम्यान, पुणे-बेंगलोर महामार्गावर झालेल्या रास्ता रोको आंदोलनाच्या वेळीही आयोगाची उपस्थिती होती.
प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी विशेष सरकारी वकील नियुक्त करण्याची आणि खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्याची शिफारस शासनाकडे करण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले. तसेच न्याय मिळेपर्यंत आयोग पीडित कुटुंबासोबत ठामपणे उभा राहणार असल्याचा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
पीडितेला न्याय मिळवून देण्यास सरकार कटिबद्ध – राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर
मुंबई : नसरापूर येथे अल्पवयीन बालिकेसंदर्भात घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक असून या प्रकरणाची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे. पीडित बालिकेला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि आरोपीला कायद्याच्या चौकटीत कठोर शिक्षा व्हावी, यासाठी शासन कटिबद्ध असल्याची माहिती महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर यांनी दिली.
या प्रकरणातील न्यायप्रक्रिया जलदगतीने पार पडावी यासाठी विशेष सरकारी वकील नियुक्त करण्याबाबत तसेच खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आले आहेत. पीडित बालिकेच्या कुटुंबियांना शासनामार्फत सर्वतोपरी मदत आणि सहकार्य उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
धामणगाव येथील प्रत्येक बाधित कुटुंबाला शासनाची त्वरित मदत – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
नागपूर: भिवापूर तालुक्यातील धामणगाव येथे काल सायंकाळी उशिरा लागलेल्या भीषण आगीत अनेक कुटुंबांच्या घरांचे मोठे नुकसान झाले. महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज इथे प्रत्यक्ष भेट देऊन प्रत्येक कुटुंबियांकडून व्यथा ऐकून घेत जळालेल्या घरांची प्रत्यक्ष पाहणी केली. प्रत्येक बाधित कुटुंबाला खनिकर्म महामंडळामार्फत २.५ लाख रुपये, राज्य शासनाकडून २३ हजार रुपयांची मदत, तसेच कोराडी श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिर संस्थानकडून २० लाख रुपये, अत्यावश्यक भांडी देत असल्याचे त्यांनी जाहीर केले.
मंत्री बावनकुळे आज दुपारी तातडीने अर्थ व नियोजन राज्यमंत्री अॅड आशिष जैस्वाल, स्थानिक आमदार डॉ. संजय मेश्राम, सरपंच वैशाली चौधरी, माजी आमदार राजू पारवे, सुधीर पारवे, आनंदराव राऊत, प्रमोद घरडे, उपविभागीय अधिकारी उमेश चव्हाण व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत भेट देऊन बाधित कुटुंबियांच्या व्यथा ऐकून त्यांना धीर दिला.
काल रात्री अचानक आलेल्या वादळवाऱ्यात आगीने अनेक घरांना वेढून टाकले. घटना कशी घडली ते पोलीस यंत्रणा पूर्ण तपास करेल; मात्र, गावकऱ्यांनी जी एकजूट व धैर्य दाखवत कोणतीही जीवित हानी होवू दिली नाही हे महत्वाचे आहे. संपूर्ण गावकऱ्यांच्या या धैर्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतो, त्यांना सलाम करतो या शब्दात त्यांनी शासनाच्या वतीने ऋण व्यक्त केले.
अधिकाऱ्यांशी चर्चा करून मदत व पुनर्वसनाच्या कामांचा आढावाही आम्ही घेतला आहे. नुकसानग्रस्तांना तातडीने दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत. यासोबतच अन्नधान्य, जीवनावश्यक साहित्य याचे वाटप आरोग्य शिबिर, पाणी टँकर, विद्यार्थ्यांसाठी पुस्तके व गणवेश, तसेच जळालेल्या कागदपत्रांसाठी विशेष शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. ज्यांची घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली त्यांच्या नुकसानी प्रमाणे ही मदत राहील. सर्व घरांचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानीच्या प्रमाणात शासन निश्चित मदत करेल असे स्पष्ट करून पालकमंत्री बावनकुळे यांनी त्यांच्या घरबांधणीसाठी मोफत रेती व्यवस्था करू असे सांगितले.
ज्यांच्याकडे अतिरिक्त खोल्या उपलब्ध आहेत त्यांनी आपली घरे बाधित कुटुंबांना तात्पुरती भाड्याने द्यावीत अशी गावकऱ्यांना त्यांनी विनंती केली. प्रशासनाच्या माध्यमातून सर्व बाधित कुटुंबांचे पुनर्वसन तातडीने व प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत दिली जाईल, याची खात्री गावकऱ्यांना त्यांनी दिली.
नसरापूर प्रकरणी आरोपीस फाशीच्या शिक्षेसाठी प्रयत्न – मंत्री आदिती तटकरे
मुंबई: नसरापूर येथे घडलेल्या अमानुष आणि संतापजनक घटनेची माहिती मिळाल्यानंतर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला असून, त्या सातत्याने कुटुंबाच्या संपर्कात आहेत. मनोधैर्य योजनेअंतर्गत पीडित कुटुंबाला आर्थिक सहाय्य दिले जाणार असून, आरोपीस फाशीची शिक्षा मिळावी, यासाठी विशेष सरकारी वकिलामार्फत संपूर्ण प्रयत्न करण्यात येणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
स्थानिक आमदार शंकर मांडेकर यांच्या माध्यमातून मंत्री तटकरे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. या कठीण प्रसंगी राज्य शासन पीडित कुटुंबाच्या पाठीशी उभे असून, प्रकरणाचा जलद निपटारा व्हावा यासाठी सुनावणी जलदगती न्यायालयात होणार असल्याचे त्यांनी ग्रामस्थांना आश्वासित केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि मंत्री आदिती तटकरे यांनी पीडित कुटुंबीय व ग्रामस्थांना न्याय मिळवून देण्याबाबत आश्वासन दिले आहे. यासंदर्भातील अधिकृत पत्र जिल्हा प्रशासनामार्फत कुटुंबीयांना देण्यात आले आहे.
दरम्यान, महिला व बालविकास विभागाच्या वतीने मनोधैर्य योजनेअंतर्गत पीडित कुटुंबाला आर्थिक व मानसिक सहाय्य दिले जाणार असून, त्यासाठीची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
स्वगणना अभियान : देशाच्या विकासात एक महत्त्वाचे पाऊल !
आपल्या कार्याला जगभरात ओळख मिळवून देणाऱ्या, ‘बीजमाता’ म्हणून परिचित असलेल्या पद्मश्री सौ. राहिबाई पोपेरे यांनी एका जागरूक नागरिकाचे कर्तव्य बजावत आपली ‘स्वगणना’ यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे.
त्यांनी मौजे पोपेरेवाडी (ता. अकोले, जि. अहिल्यानगर) येथे डिजिटल प्रणालीचा वापर करून आपली नोंदणी केली. एका तंत्रज्ञान-स्नेही आणि प्रगत भारताचे हे एक उत्तम उदाहरण आहे.
देशाच्या आणि राज्याच्या भविष्यातील योजना आणि विकासाच्या योग्य नियोजनासाठी प्रत्येक नागरिकाची नोंद अत्यंत महत्त्वाची आहे. प्रशासनातर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, पद्मश्री सौ. राहिबाई पोपेरे यांचा आदर्श घेत आपणही आपली आणि आपल्या कुटुंबाची स्वगणना वेळेत पूर्ण करावी.
आपली नोंद, देशाचा विकास !
स्थळ : मौजे पोपेरेवाडी, ता. अकोले, जि. अहिल्यानगर.
#स्वगणना#SelfEnumeration#CensusOfIndia#PadmaShri#RahibaiPopere#SeedMother#Ahilyanagar#Maharashtra#DigitalIndia#राष्ट्रीयकर्तव्य#माझीनोंदमाझाविकास#MaharashtraGovt#MyGovMaharashtra



