मुंबई: मुंबई उपनगर जिल्ह्यातील इतर मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग, तसेच विमुक्त जाती व भटक्या जमाती (विजाभज) प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना देशातील नामांकित महाविद्यालयांमध्ये उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयामार्फत ‘प्रधानमंत्री यशस्वी’ योजनेंतर्गत महाविद्यालयीन उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या लाभासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी https://scholarships.gov.in या संकेतस्थळावर ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत.
या योजनेअंतर्गत राज्यातील योजनेत समाविष्ट महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या इतर मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या मागास तसेच विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे. योजनेसाठी विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे. विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शिष्यवृत्ती संकेतस्थळावर अर्ज सादर करणे आवश्यक असून ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२६ असून, महाविद्यालयस्तरीय पडताळणी १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हा, राज्य व मंत्रालयीन स्तरावरील पडताळणीची प्रक्रिया ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.
पात्र विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत अर्ज करून शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा. तसेच संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना अर्ज प्रक्रिया वेळेत आणि अचूकपणे पूर्ण करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य करावे, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या मुंबई उपनगर येथील सहाय्यक संचालक मयुरी कदम यांनी केले आहे.
