मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘मंथन फॉर युवा २०२६’ या उपक्रमाचा समारोप झाला. शिक्षण कौशल्य, क्रीडा स्टार्टअप आदी क्षेत्रात युवा पिढीचा सकारात्मक सहभाग असून तो वाढविण्यासोबतच स्टार्टअप इकोसिस्टममध्ये चर्चा करून चांगली पॉलिसी तयार करण्यात येईल, असे त्यांनी तरुणाईला संबोधित करताना सांगितले.
ढोल ताशा पथकाचा जागतिक विक्रम तसेच विविध क्षेत्रातील आयकॉन असलेल्या व्यक्तींसोबत थेट संवाद, नशामुक्त महाराष्ट्र व देश यासाठी युवकांना शपथ आदी उपक्रम यानिमित्ताने आयोजित करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने युवक व युवतींनी सहभाग नोंदवला.
सुप्रसिद्ध क्रीडा समालोचक रिधिमा पाठक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत क्रिकेटपटू तिलक वर्मा, राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते दिलीप महादू गावित, अर्जुन देशपांडे, किरण शहाजी यांच्याशी संवाद साधत त्यांच्या कार्याची प्रेरणा व अनुभव युवकांसमोर मांडले.
महाराष्ट्राची परंपरा असलेल्या ढोल ताशा पथकाने ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’, ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि ‘वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया’मध्ये जागतिक विक्रम नोंदविला आहे. आधार नोंद असलेल्या ५८५ ध्वजधारकांच्या या उपक्रमामुळे जागतिक विक्रमाची नोंद झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी विश्वविक्रम नोंदविलेल्या संपूर्ण चमूचे अभिनंदन केले.
आजची युवा पिढी सर्वच क्षेत्रांत आपल्या कौशल्याने नावलौकिक मिळवत आहे. संविधानामुळेच लोकशाही प्रगल्भ झाली आहे. त्यामुळेच मला मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे. युवकांना शासनाची संपूर्ण मदत करण्याचे धोरण असून स्टार्टअपसाठी इकोसिस्टीम पॉलिसी तयार करण्यात आली आहे. या धोरणामध्ये युवकांना शंभर टक्के मदत करण्याचा उद्देश असून युवकांसोबत चर्चा करून आणखी चांगले धोरण तयार करण्यात येईल. मुलांचा स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी विचारमंथन सुरू आहे. स्क्रीनवरून मैदानावर कसे वळता येईल याबद्दलही या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून निश्चित धोरण ठरविण्यात येणार आहे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
