Home महाराष्ट्र त्याग, सेवा आणि समर्पणाचा ३५० वा शहिदी समागम – एक अविस्मरणीय अनुभव

त्याग, सेवा आणि समर्पणाचा ३५० वा शहिदी समागम – एक अविस्मरणीय अनुभव

350th Martyr's Gathering of Sacrifice, Service and Dedication – An Unforgettable Experience

नागपूर, नांदेड आणि आता नवी मुंबई अशा तीन टप्प्यांतून प्रवाहित झालेला हा भक्तिसोहळा २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी परमोच्च शिखरावर पोहोचला. या दोन दिवसांत केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देशातून भाविकांचा ओघ नवी मुंबईकडे वळला होता. या समागमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे सर्वसमावेशक स्वरूप. सीख समुदायासोबतच सिकलगर, सिंधी, मोहयाल, लबाणा, बंजारा, वाल्मिकी आणि नामदेव भगत वारकरी संप्रदायातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा केवळ एका धर्माचा सोहळा नव्हता, तर तो मानवतेचा उत्सव होता.

पहाटेपासूनच “वाहे गुरु” च्या जपामध्ये भाविक रांगा लावून श्री गुरु ग्रंथसाहिबजींच्या दर्शनासाठी आसुसलेले दिसत होते. अखंड कीर्तन आणि रसाळ गुरुवाणीने, या समागमातील थोर संत महात्म्यांच्या उपस्थितीने हा संपूर्ण परिसर एका वेगळ्याच आध्यात्मिक विश्वात नेऊन ठेवला होता.

विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लंगरमध्ये सेवा दिली, जे पाहून उपस्थित भाविक भारावून गेले. याशिवाय ‘जुता घर’ ही संकल्पना देखील तितकीच आध्यात्मिक होती. भाविकांची पादत्राणे सांभाळणे, ही सेवा करून स्वतःचा अहंकार त्यागण्याची आणि नम्रतेची साधना येथे अनेक सेवाभावी संस्थांच्या सदस्यांनी केली.

कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी महत्त्वाच्या घोषणांनी या सोहळ्याला ऐतिहासिक परिमाण प्राप्त करून दिले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे या उपक्रमाचे कौतुक केले, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री गुरु तेग बहादुर साहिबजींच्या बलिदानाचा इतिहास आता महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केला जाईल, अशी महत्त्वाची घोषणा केली. तसेच, नवी मुंबईत त्यांच्या नावाने एक भव्य रुग्णालय उभारण्याचा निर्णयही जाहीर केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरूंच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी राज्यभर ‘डिजिटल रथ’ फिरवण्याचा संकल्प बोलून दाखवला. तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनीही अल्पसंख्याक समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन प्रयत्नशील असल्याचा विश्वास व्यक्त केला.

नियोजनाचे आव्हान आणि यशस्वी पूर्तता..!

लाखो भाविकांची उपस्थितीत असलेल्या कार्यक्रमाचे नियोजन करणे हे एक शिवधनुष्य पेलण्यासारखे होते. पण गुरुसाहेबांच्या कृपेने आणि प्रशासन, स्वयंसेवक व सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने हे शक्य झाले. भाविकांसाठी उभारण्यात आलेला ‘भव्य लंगर’ हा श्रद्धेचा आणि नि:स्वार्थ सेवेचा कळस होता. जाती-पातीचे, उच्च-नीचतेचे सर्व अडसर दूर सारून लाखो लोकांनी या प्रसादाचा लाभ घेतला. चहा, अल्पोपहार, ज्यूस आणि विविध माहितीपर स्टॉल्सच्या माध्यमातून प्रत्येकाची काळजी घेतली जात होती.

कोकण, पुणे आणि नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय, या विभागातील सर्व जिल्हे, सर्व महानगरपालिका, सिडको, पोलीस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा यांच्यासह विविध शासकीय विभागांनी या सोहळ्यात घेतलेली भूमिका अत्यंत कौतुकास्पद आहे. विशेष म्हणजे कोकण विभागीय आयुक्त कार्यालय, रायगड आणि ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, सिडको आणि पनवेल व नवी मुंबई नगरपालिका, नवी मुंबई पोलीस आयुक्तालय यांनी समर्पित भावनेने दिलेल्या सेवेचे कौतुक करावे तितके कमीच आहे. पिण्याच्या पाण्याचे नियोजन असो किंवा स्वच्छतेसाठी तैनात केलेले शेकडो कर्मचारी आणि घंटागाड्या; प्रत्येक स्तरावर शिस्त दिसून येत होती. वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी २५० ट्रॅफिक वॉर्डन्सनी अहोरात्र कष्ट घेतले, ज्यामुळे कुठेही विस्कळीतपणा जाणवला नाही.

तंत्रज्ञान आणि इतिहासाची सांगड

ऑडिओ-व्हिज्युअल कक्ष या समागमाचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे अत्याधुनिक ‘ऑडिओ-व्हिज्युअल कक्ष’. श्री गुरु तेग बहादुर साहिबजींनी संस्कृती रक्षणासाठी व अन्याय दूर करण्यासाठी दिलेले सर्वोच्च बलिदान नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक होते. या कक्षात एकावेळी १००० भाविक बसू शकतील, अशी व्यवस्था होती. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गुरुसाहेबांचा जीवनपट जेव्हा पडद्यावर उलगडला, तेव्हा उपस्थित्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. हा इतिहास केवळ पुस्तकात न राहता तो काळजापर्यंत पोहोचवण्याचे काम या उपक्रमाने केले.

आरोग्य सेवा: मानवतेची खरी पूजा”

माणुसकीची सेवा हीच खरी ईश्वर सेवा हा संदेश प्रत्यक्षात उतरवताना आम्ही भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. ५० तज्ज्ञ डॉक्टर आणि १०० पॅरामेडिकल स्टाफ अहोरात्र सेवेत होते. विशेष म्हणजे, ६० हून अधिक दात्यांनी रक्तदान करून गुरुसाहेबांच्या बलिदानाच्या स्मृतींना उजाळा दिला. वृद्ध आणि दिव्यांगांसाठी व्हिलचेअर आणि ई-व्हेइकलची सोय करण्यात आली होती. वाढत्या तापमानाचा विचार करून परिसरात ‘मिस्ट वेहिकल्स’ च्या माध्यमातून गारवा राखण्याचा प्रयत्न केला गेला. दंत चिकित्सा, अस्थिरोग, स्त्रीरोग तज्ज्ञांपासून ते कॅन्सर स्क्रिनिंग आणि थॅलेसेमिया प्रबोधनापर्यंत सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होत्या. ही केवळ वैद्यकीय मदत नव्हती, तर ती भाविकांप्रती असलेली कृतज्ञता होती.

सांस्कृतिक वारसा आणि शौर्याचे प्रदर्शन

या कार्यक्रमात केवळ धार्मिक विधिच नव्हते, तर शिख धर्माच्या शौर्याचे प्रतीक असलेले ‘गतका’ प्रात्यक्षिके पाहून उपस्थितांच्या अंगावर शहारे येत होते. नगर कीर्तन, पुष्पवृष्टी आणि माहितीपटांच्या माध्यमातून श्री गुरु तेग बहादुरजींच्या ‘हिंद दी चादर’ या पदवीची सार्थकता सर्वांना पटवून देण्यात आली. त्यांनी स्वतःचे शीश अर्पण करणे मान्य केले, पण तत्त्वांशी तडजोड केली नाही, हा संदेश आजच्या काळातही तितकाच प्रासंगिक आहे.

एक नवी ऊर्जा आणि दिशा..!

या समितीचा राज्य समन्वयक म्हणून काम करताना मला जाणवले की, जेव्हा हेतू शुद्ध असतो आणि सोबतीला सेवाभाव असतो, तेव्हा अशक्य गोष्टीही शक्य होतात. विविध शासकीय विभाग आणि हजारो नि:स्वार्थ स्वयंसेवकांच्या योगदानामुळेच हा ३५० वा शहिदी समागम ऐतिहासिक ठरला. श्री गुरु तेग बहादुरजींनी दिलेला त्याग आणि मानवतेचा संदेश आपल्या मनात कायम राहील. नवी मुंबई आणि राज्यातील इतर भागातून आलेल्या भाविकांनी हे सिद्ध केले की, आजही आपल्या समाजात श्रद्धा, शिस्त आणि एकता टिकून आहे. या पवित्र कार्यात खारीचा वाटा उचलता आला, याचे मला मनस्वी समाधान आहे.”वाहे गुरु जी का खालसा, वाहे गुरु जी की फतेह…!”

error: Content is protected !!
Exit mobile version