
या करारामुळे पुण्यात पुढील दहा वर्षांत सुमारे चारशे कोटी रुपयांची गुंतवणूक आणि सुमारे एक हजारावर थेट रोजगाराची निर्मिती होणार आहे. त्यासाठी या कंपनीला उत्कृष्ट कार्यपरिसर मिळण्याबरोबरच आवश्यक सर्व सहकार्य केले जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
पुणे आता ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्सचे महत्त्वाचे केंद्र बनत असून पुणे येथील प्रकल्पासाठी शासनाकडून आवश्यक परवानग्या, नोंदणी, मंजुरी, सवलती आणि अन्य प्रशासकीय बाबींमध्ये विद्यमान धोरणांनुसार सहकार्य करण्यात येणार आहे. उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागांच्या माध्यमातून या गुंतवणुकीला गती देण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
या प्रकल्पामुळे स्थानिक पुरवठा साखळीला मोठी चालना मिळणार असून, सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना जागतिक पुरवठा साखळीशी जोडण्याची संधी उपलब्ध होणार आहे; तसेच अत्याधुनिक उत्पादन, ऊर्जा उपकरण निर्मिती आणि प्रिसिजन इंजिनिअरिंग क्षेत्रात महाराष्ट्राची क्षमता अधिक मजबूत करण्यास हातभार लाभणार आहे.
याप्रसंगी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अन्बळगण, गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, अग्रेको इंडियाचे संचालक सन्नी ठकरार, ग्रुप प्रमुख स्टीफन रेआ, व्यवस्थापकीय संचालक राहुल खरे, हेड ऑफ प्रोक्युअरमेंट अँड ग्लोबल सप्लाय सुनील देशमुख, व्यापार सल्लागार मार्क बिरेल, वरिष्ठ व्यापार सल्लागार प्रतीक्षा क्षीरसागर आदी उपस्थित होते.