
नाशिक : नासिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा-२०२७ साठी घाटांची वहनक्षमता, मार्गनिहाय भाविकांची संख्या, पार्किंग व्यवस्था, सार्वजनिक वाहतूक, वाहन होल्डिंग एरिया, वीज-पाणी सुविधा आणि विशेष धार्मिक दिवसांचा विचार करून वैज्ञानिक, डेटा-आधारित, तंत्रज्ञानाधारित व खर्च-परिणामकारक मोबिलिटी आराखडा तयार करावा. तसेच सर्व विभागांनी समन्वयाने नियोजन करून वेळबद्ध कार्यवाही करावी, असे निर्देश नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयात सिंहस्थ-२०२७ साठी पार्किंग व मोबिलिटी नियोजनासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक संजय ऐनपुरे, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, महावितरण विभागाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, किशोर काळे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
डॉ. गेडाम यांनी सांगितले की, मार्गनिहाय भाविकांचे प्रमाण व पार्किंगची आवश्यकता ही सध्या नियोजनासाठीची गृहीतके असून, परिस्थितीनुसार त्यामध्ये आवश्यक बदल करण्याची लवचिकता ठेवावी. मात्र जमीन संपादन, अंदाजपत्रके, निविदा प्रक्रिया आणि पार्किंग विकासाची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी नियोजनाची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले. पार्किंग नियोजनाबाबत त्यांनी स्पष्ट केले की, पार्किंगसाठी आवश्यकतेपेक्षा जास्त जमीन विकसित करून मोठा खर्च करणे टाळावे. पार्किंग सुविधा प्रामुख्याने काही प्रमुख स्नानदिवसांसाठी वापरल्या जाणार असल्याने प्रत्यक्ष गरज, वैज्ञानिक विश्लेषण या तत्त्वांवर आधारित आराखडा असावा. आवश्यकता भासल्यास पार्किंग क्षेत्राचा फेरआढावा घेऊन त्यात बदल करण्याचाही पर्याय विचारात घ्यावा. पार्किंग क्षेत्रांमध्ये शासनाकडून मुख्यत्वे जमीन समतल करणे, सुरक्षित प्रवेश-निर्गमन मार्ग, वीज व पाणीपुरवठा या मूलभूत सुविधा उपलब्ध करणे, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, प्रकाशयोजना, सीसीटीव्ही, क्लोकरूम आदी सुविधा उपलब्ध करण्याचे नियोजन करावे.
महावितरणला बाह्य पार्किंगची सर्व स्थाने यांची माहिती उपलब्ध करून देऊन प्रत्येक ठिकाणच्या वीज गरजेचे मूल्यांकन करावे.आवश्यकतेनुसार नवीन ट्रान्सफॉर्मर, फीडर क्षमता वाढविणे तसेच ग्रामीण भागातील वीजपुरवठा व्यवस्थेत करून, प्रत्येक बाह्य पार्किंगसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा आराखडाही तयार करण्यात यावा. अशा सूचना विभागीय आयुक्त श्री गेडाम यांनी दिल्या.
बैठकीत आउटर पार्किंगला ट्रान्झिट हब म्हणून विकसित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. बाहेरील जिल्ह्यांतून येणाऱ्या राज्य परिवहन व इतर खासगी बससेवा आउटर पार्किंगपर्यंत येतील. तेथून त्र्यंबकेश्वर तसेच अन्य महत्त्वाच्या स्थळांसाठी बससेवा उपलब्ध करण्याबरोबरच स्वतंत्र कॅब झोन विकसित करण्याचाही विचार करण्यात आला. आउटर पार्किंग ते इनर पार्किंग या टप्प्यात नियंत्रित स्वरूपात कॅब, ऑटोरिक्षा, ई-रिक्षा व इतर आयपीटी सेवांचा वापर करण्याबाबत चर्चा झाली. त्यासाठी स्वतंत्र मार्ग, डिजिटल नोंदणी, नियंत्रण व्यवस्था आणि अधिकृत सेवा पुरवठादारांची प्रणाली विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र घाट परिसरात कोणत्याही खासगी वाहनांना प्रवेश किंवा पार्किंगला परवानगी दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
हॉटेल्स आणि ट्रॅव्हल ऑपरेटर्सच्या मोठ्या बसला प्रवासी उतरविण्यासाठी नियोजित ड्रॉप-अँड-रिटर्न प्रणालीचा अवलंब करण्याचा प्रस्तावही बैठकीत मांडण्यात आला. इनर पार्किंगमध्ये पार्किंगला परवानगी न देता संबंधित बसने प्रवासी उतरवून पूर्वनियोजित ठिकाणी परत जाण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यात येणार आहे.
बैठकीच्या प्रारंभी कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी सिंहस्थ-२०२७ साठी तयार करण्यात आलेल्या पार्किंग व मोबिलिटी आराखड्याचे सविस्तर सादरीकरण केले. यामध्ये पेठ रोड–दिंडोरी रोड, धुळे रोड, छत्रपती संभाजीनगर रोड, पुणे रोड–समृद्धी महामार्ग आणि त्र्यंबकेश्वर मार्ग या प्रमुख प्रवेशमार्गांवरील मार्गनिहाय भाविकांचे प्रमाण, संभाव्य वाहतूक नियोजन, पार्किंग आवश्यकता, वाहन होल्डिंग एरिया, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तसेच पार्किंग नियोजनाचा तपशील सादर करण्यात आला. या सादरीकरणावर उपस्थित विभागप्रमुख व तज्ज्ञांकडून सूचक अभिप्राय व सूचना घेण्यात आल्या.
श्री. सिंह यांनी सांगितले की, सिंहस्थ काळात भाविकांच्या आगमनाचा वैज्ञानिक अभ्यास करून प्रत्येक मार्गावरील वाहतुकीचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात येत आहे. त्यानुसार मार्गनिहाय पार्किंग, वाहन होल्डिंग एरिया, शटल बस सेवा, सार्वजनिक वाहतूक आणि आपत्कालीन परिस्थितीतील पर्यायी व्यवस्था निश्चित करण्यात येणार आहे. घाटांची प्रत्यक्ष वहनक्षमता आणि वाहन होल्डिंग एरियाची क्षमता यांचा परस्पर ताळमेळ साधूनच संपूर्ण वाहतूक आराखडा अंतिम करण्यात येणार आहे. घाट परिसरात सुरक्षितरीत्या जितके भाविक हाताळता येतील त्यानुसारच वाहनांना शहरात प्रवेश देण्यात यावा. आवश्यक असल्यास संगमनेर, सिन्नर, धुळे, मालेगाव आदी बाह्य केंद्रांमध्ये वाहन होल्डिंग एरिया विकसित करून वाहनांना टप्प्याटप्प्याने शहरात प्रवेश देण्याचे नियोजन करण्याच्या सूचना आयुक्त सिंह यांनी दिल्या.
यावेळी २ ऑगस्ट २०२७ रोजी होणारे सूर्यग्रहण, त्या दिवशी अपेक्षित धार्मिक स्नान, कालावधीमुळे विशिष्ट वेळेत वाढणारी गर्दी यांचाही वाहतूक व सुरक्षा नियोजनात स्वतंत्रपणे समावेश करण्याचे निर्देश देण्यात आले.
बैठकीच्या शेवटी डॉ. गेडाम यांनी घाट क्षमता, मार्गनिहाय भाविकांचे प्रमाण, पार्किंग, सार्वजनिक वाहतूक, होल्डिंग एरिया, वीज-पाणी सुविधा, डिजिटल मॅपिंग, आपत्कालीन नियोजन आणि खर्च-परिणामकारकतेचा समन्वय साधून सिंहस्थ-२०२७ साठी सर्वंकष व लवचिक पार्किंग आणि मोबिलिटी आराखडा तातडीने अंतिम करण्याचे निर्देश सर्व संबंधित विभागांना दिले.