Home महाराष्ट्र मांडवा-मरीना व रेवस-मांडवा जेट्टी कामांना गती द्या -मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश...

मांडवा-मरीना व रेवस-मांडवा जेट्टी कामांना गती द्या -मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

Accelerate the work of Mandwa-Marina and Revas-Mandwa Jetty - Fisheries and Ports Minister Nitesh Rane

मुंबई:- अलिबाग तालुक्यातील मांडवा मरीना जेट्टी विकास तसेच रेवस-मांडवा प्रवासी जेट्टी दुरुस्ती व मजबूतीकरणाच्या कामांना गती देऊन ही कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीस आमदार महेंद्र दळवी यांच्यासह विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री नितेश राणे म्हणाले, या प्रकल्पामुळे अलिबाग- मुंबई सागरी प्रवास अधिक सुरक्षित व वेगवान होण्यास मदत होणार असून, पर्यटन व स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठा फायदा होणार आहे. कोकणातील सागरी प्रवासी वाहतूक अधिक सुरक्षित, सुलभ आणि सक्षम करण्यासाठी ही कामे पावसाळ्यापूर्वीच प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

या प्रकल्पांतर्गत अॅप्रोच जेट्टी, स्लोपिंग जेट्टी, मोठ्या व्यासाच्या पाइल्स बसविणे, तसेच अॅप्रोच चॅनलमध्ये ड्रेजिंग व विद्युत सुविधांची उभारणी यासारखी महत्त्वाची कामे समाविष्ट आहेत. या प्रकल्पाच्या एकंदरीत कामाची सुमारे ५८ टक्के भौतिक प्रगती झाली असल्याचे बैठकीत सांगण्यात आले असता  या प्रकल्पाची उर्वरित कामे प्राधान्याने मार्गी लावण्याचे निर्देश मंत्री राणे यांनी  दिले. तसेच रेवस येथील जेट्टी मजबूतीकरणाचे कामही तातडीने मार्गी लावण्याबाबत त्यांनी सूचित केले.

मांडवा प्रवासी जेट्टीबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. वाढती प्रवासी संख्या व बोटींची संख्या लक्षात घेता जेट्टीची दुरुस्ती व मजबूतीकरण आदी कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत. आयआयटी मुंबईच्या तांत्रिक अहवालानुसार जेट्टीच्या संरचनेत तातडीने दुरुस्तीची गरज असून प्राथमिक दुरुस्तीची कामे सुरू आहेत. दोन्ही प्रकल्पांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना मत्स्यव्यवसाय  व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

error: Content is protected !!
Exit mobile version