Home महाराष्ट्र महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘आदिशक्ती अभियाना’ला गती – मंत्री आदिती तटकरे

महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘आदिशक्ती अभियाना’ला गती – मंत्री आदिती तटकरे

Acceleration of 'Adi Shakti Abhiyan' for women empowerment – ​​Minister Aditi Tatkare

मुंबई : राज्यातील प्रत्येक महिलेच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘आदिशक्ती अभियाना’ला राज्यभर गती मिळत आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी राज्यातील ३५१ तालुका आणि २६ हजार ५९ ग्रामस्तरीय समित्या स्थापन करण्यात आल्या असून, या समित्यांचे प्रशिक्षण आणि अभियानाची कार्यवाही अधिक प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

‘आदिशक्ती अभियान व पुरस्कार योजने’ च्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रालयात आढावा बैठक झाली, यावेळी मंत्री तटकरे यांनी विभागनिहाय आढावा घेतला. यावेळी विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, सहसचिव वि.रा. ठाकूर, सहआयुक्त राहूल मोरे, अवर सचिव सुनील सरदार उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे विभागाचे आयुक्त, एकात्मिक बालविकास विभागाचे आयुक्त कैलास पगारे, तसेच छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोकण, नागपूर आणि अमरावती विभागांचे विभागीय आयुक्त सहभागी झाले होते.

मंत्री तटकरे म्हणाल्या की, राज्यातील महिलांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय सक्षमीकरणासाठी ‘आदिशक्ती अभियान’ महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या माध्यमातून महिला बचतगटांचे सक्षमीकरण, महिला सुरक्षा व न्यायप्रवेश, आरोग्य व पोषण जनजागृती, शैक्षणिक व व्यावसायिक उन्नती, नेतृत्व विकास आणि सामाजिक सहभाग वाढविण्यावर भर दिला जात आहे. या अभियानाच्या माध्यमातून महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबतची जनजागृती ग्रामस्तरावरील प्रत्येक महिलांपर्यंत पोहोचविणे हे ध्येय ठेवले आहे.

जिल्हा, तालुका आणि ग्रामस्तरीय समित्यांचे प्रशिक्षण तातडीने पूर्ण करून त्याचा अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचे निर्देश मंत्री तटकरे यांनी संबंधित विभागीय आयुक्तांना दिले.

‘ग्रामसमृद्धी योजने’च्या धर्तीवर ग्रामसभांमध्ये या अभियानाच्या प्रसारासाठी कार्यवाही करावी, तसेच योजनेची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी माहिती पुस्तिका तयार करण्यात यावी, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

error: Content is protected !!
Exit mobile version