(नंदुरबार) जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता 9 वी आणि 11 वीच्या प्रवेशासाठी आयोजित करण्यात आलेल्या निवड चाचणी परीक्षेचे प्रवेशपत्र (Admit Card) नवोदय विद्यालय समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असून ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज केले आहेत, त्यांनी त्वरित आपले प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यावे, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालय, श्रावणी, नंदुरबार-2 प्राचार्य पी. आर. कोसे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
ही प्रवेश परीक्षा शनिवार, दिनांक 07 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता आयोजित करण्यात आली असून उमेदवारांनी नवोदय विद्यालय समितीच्या अधिकृत संकेतस्थळ www.navodaya.gov.in किंवा थेट लिंक https://cbseitms.rcil.gov.in/nvs वरून आपले प्रवेशपत्र डाउनलोड करावे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांचा नोंदणी क्रमांक (Registration Number) आणि जन्मतारीख (Date of Birth) आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी डाउनलोड केलेल्या प्रवेशपत्राची प्रिंट काढणे अनिवार्य आहे. प्रवेशपत्रावरील नाव, फोटो, परीक्षा केंद्राचा पत्ता आणि परीक्षेची वेळ यासारखे सर्व तपशील काळजीपूर्वक तपासावेत. परीक्षेच्या दिवशी, प्रवेशपत्रासोबत एक आवश्यक ओळखपत्र देखील बाळगणे बंधनकारक आहे, असेही जवाहर नवोदय विद्यालय, श्रावणी, नंदुरबार-2 प्राचार्य श्री. कोसे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
