
(परभणी) – हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे दि. 24 व 25 जानेवारी रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या प्रचार-प्रसिद्धीसाठी परभणी जिल्ह्यात दाखल झालेल्या प्रचार चित्ररथाला जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या धर्मरक्षणासाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाची, मानवता, सहिष्णुता आणि त्यागाच्या मूल्यांची जाणीव समाजात पोहोचविणे हा या शहीदी समागमाचा मुख्य उद्देश असून, नांदेड येथील कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.