केंद्रीय शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त, कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित, एआय फॉर इंडिया 2.0 हा मोफत ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ केला. स्किल इंडिया आणि GUVI यांचा संयुक्त उपक्रम असलेला, तसेच NCVET आणि आयआयटी मद्रास मान्यताप्राप्त असलेला हा ऑनलाइन कार्यक्रम तरुणांना अद्ययावत कौशल्ये प्रदान करेल.
तंत्रज्ञानाला भाषेच्या मर्यादा असू नयेत आणि जास्तीतजास्त भारतीय भाषांमध्ये तंत्रज्ञान विषयक अभ्यासक्रम उपलब्ध व्हायला हवेत, असे ते यावेळी म्हणाले. तंत्र शिक्षणातील भाषेचा अडथळा दूर करण्याच्या, आणि विशेषतः ग्रामीण भागातील युवा शक्तीचे भविष्य सुरक्षित करण्याच्या दिशेने ही चांगली सुरुवात असल्याचे ते म्हणाले.
भारत हा तंत्रज्ञान स्नेही देश असून, भारताची डिजिटल पेमेंट आत्मसात करण्याची यशोगाथा उल्लेखनीय असल्याचे ते म्हणाले. समाजाच्या तळागाळातील जनतेला अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण देण्यासाठी GUVI ने हा पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
देशाच्या प्रत्येक भागात कृत्रिम बुद्धिमत्तेचे ज्ञान सहज उपलब्ध करून देणाऱ्या या अभिनव उपक्रमाचे, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.
GUVI आणि आयआयटी मद्रासचा हा स्टार्टअप उपक्रम म्हणजे भारतीय भाषांमध्ये तंत्र शिक्षण सुलभ करणारा एक टेक-प्लॅटफॉर्म (तंत्रज्ञान विषयक व्यासपीठ) आहे. हा कार्यक्रम 9 भारतीय भाषांमध्ये तयार करण्यात आला आहे.