Home महाराष्ट्र निम्न पेढी प्रकल्पग्रस्तांना सर्व सुविधा देणार

निम्न पेढी प्रकल्पग्रस्तांना सर्व सुविधा देणार

All facilities will be provided to the lower caste project affected people.

अमरावती : निम्न पेढी प्रकल्पात पाच गावांचे पुनर्वसन करण्यात येत आहे. या मान्सून हंगामात प्रकल्पात पाणी साठविण्यास सुरूवात होणार आहे. त्यामुळे या गावातील स्थलांतरणासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसित करण्यात येणाऱ्या ठिकाणी सर्व सुविधा देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.

निम्न पेढी प्रकल्पातील पुनर्वसनाबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेण्यात आला. यावेळी उपजिल्हाधिकारी श्रद्धा उदावंत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बयास यांच्यासह बाधित पाचही गावांचे सरपंच आणि सिंचन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

केंद्र शासनाच्या प्राधान्यक्रमातील निम्न पेढी प्रकल्पात हातुर्णा, गोपगव्हाण, कुंड खुर्द, अळणगाव, कुंड सर्जापूर ही पाच गावे बाधित होणार आहे. यासाठी या गावातील रहिवाशांचे स्थलांतर करण्यावर भर देण्यात येणार आहे. सध्यास्थितीमध्ये अळणगाव येथे 79 आणि कुंड सर्जापूर येथे 72 नागरीक वास्तव्यास आहेत. त्यामुळे या नागरिकांच्या स्थलांतरणासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. पुनर्वसित गावात सहमती देऊन स्थलांतरीत झालेल्यांना प्लॉटचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरीत गावातील नागरिकांना स्थलांतरणासाठी भत्ता, घरकुल मंजूर करण्यात आले आहे. पुनर्वसित गावात नागरी सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.

येत्या पावसाळ्यात प्रकल्पामध्ये पाणी साठणार असल्याने जुन्या गावातील नागरिक बाधित होणार आहे. यामुळे बाधित झाल्यानंतर त्यांचा बचाव करावा लागू नये, यासाठी पूर्व तयारी म्हणून आतापासून त्यांच्या स्थलांतरणासाठी प्रयत्न करावा. हातुर्णा येथे अंगणवाडीचे काम सुरू करण्यात आले आहे. गोपगव्हाण येथील पाणी पुरवठ्याची विजेची व्यवस्था सुरळीत राहावी, यासासाठी प्रयत्न करावेत. अळणगाव येथील स्मशानभूमीवरील अतिक्रमण काढण्यात यावे. कुंड सर्जापूर प्रार्थनास्थळांसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.

error: Content is protected !!
Exit mobile version