Home महाराष्ट्र बांबू लागवडीतून शाश्वत उत्पन्नाचा मार्ग; ‘बिज संवर्धन’ घरोघरी व्हावे

बांबू लागवडीतून शाश्वत उत्पन्नाचा मार्ग; ‘बिज संवर्धन’ घरोघरी व्हावे

Bamboo cultivation is a way to achieve sustainable income; 'Seed conservation' should be done at every household level

(गडचिरोली) कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषी विभाग, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कोया कृषी कुंभ २०२६’ या भव्य कृषी महोत्सवात आज तिसऱ्या दिवशी परिचर्चा व परिसंवादाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शाश्वत शेती, बांबू लागवड, बिज संवर्धन, नैसर्गिक खते आणि कृषी पर्यटन या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

या महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमी खर्चातील, पर्यावरणपूरक व बाजाराभिमुख शेतीकडे वळवण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

*बांबू लागवड ही आर्थिक उत्पादनाची मोठी संधी*

राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून बांबू लागवड ही आर्थिक उत्पादनाची मोठी व शाश्वत संधी असल्याचे स्पष्ट केले. कमी उत्पादन खर्च, कमी मनुष्यबळ आणि विविध हवामानात हमखास येणारे पीक ही बांबूची प्रमुख वैशिष्ट्ये सांगत प्रत्येक शेतकऱ्याने बांबू लागवडीकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले.

केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांतर्गत बांबू लागवडीसाठी अर्थसहाय्य उपलब्ध असल्याने त्या योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या उत्पन्नात वाढ करावी, असे त्यांनी नमूद केले. वनसंपत्ती व आदिवासी बहुल असलेल्या गडचिरोली जिल्ह्यासाठी बांबू लागवड ही दीर्घकालीन आणि सुरक्षित उत्पन्नाची संधी असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातच प्रस्तावित बांबूपासून इंधन निर्मिती कारखान्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीला चालना मिळणार असल्याकडे लक्ष वेधत वाढत्या कार्बन उत्सर्जनाच्या पार्श्वभूमीवर वृक्षसंवर्धनावर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच समाजातील दुर्बल घटकांसाठी संवेदनशीलतेने काम करण्याचा संदेश त्यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला.

*‘बिज संवर्धन’ घरोघरी व्हावे – राहीबाई पोपेरे*

या कार्यक्रमात पद्मश्री पुरस्कारप्राप्त बीजमाता राहीबाई पोपेरे यांनी स्वदेशी बियाण्यांचे संवर्धन व शाश्वत शेती या विषयावर प्रभावी मार्गदर्शन केले. सध्या त्यांच्या संकलनात २०० वाण उपलब्ध असून त्यापैकी १५४ वाणांची नोंदणी झाल्याची माहिती त्यांनी दिली.

“मी शाळेत शिकलेली नाही; निसर्गाची शाळा शिकलेली आहे. ‘जुन ते सोन’ जतन केले आहे,” असे सांगत बिज संवर्धनाचे विचार घरोघरी पोहोचावेत आणि प्रत्येक घरात हे काम व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

“बियाणे म्हणजे शेतकऱ्याची ओळख आहे. ती जपली तरच आपली शेती, आरोग्य आणि पुढची पिढी सुरक्षित राहील,” असे सांगत पारंपरिक वाणांचे संवर्धन करून पोषण व आरोग्याकडे लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

*नैसर्गिक खते व कृषी पर्यटनावर भर*

दुसऱ्या सत्रात डॉ. संतोष चौहान, संचालक (बांधावरील प्रयोगशाळा, वाशीम) यांनी शेतातच नैसर्गिक खतनिर्मिती करून उत्पादन खर्च कमी करण्याचा मार्ग सांगितला. महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या सहकार्याने ११४० जैविक निविष्ठा संसाधन केंद्रांना मान्यता मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

गडचिरोली हा रासायनिक खतांचा तुलनेने कमी वापर असलेला जिल्हा असल्याने नैसर्गिक शेतीसाठी येथे मोठी संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

त्यानंतर पांडुरंग तावरे, संचालक (शिवतीर्थ पर्यटन केंद्र, वायगाव) यांनी कृषी पर्यटन या विषयावर मार्गदर्शन करत, “जे पिकते ते विकता आले पाहिजे आणि जे विकते ते पिकवता आले पाहिजे,” हा मंत्र दिला. गडचिरोली जिल्ह्यात कृषी पर्यटनासाठी मोठा वाव असून या माध्यमातून शेतकऱ्यांसोबतच ग्रामीण युवकांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.

*शेतकरी व विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग*

या महोत्सवात गडचिरोली जिल्ह्यासह आजूबाजूच्या परिसरातील शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध स्टॉल्सना भेटी देत शासकीय योजना, कृषी विद्यापीठांचे तंत्रज्ञान व तज्ज्ञांचे मार्गदर्शन अनुभवले. १,७०० पेक्षा अधिक शेतकरी, शेकडो विद्यार्थी तसेच विविध शासकीय विभाग व संस्थांचा सहभाग या महोत्सवाला लाभला.

*८ फेब्रुवारीला ‘नाचणीचा शिरा’ – विश्वविक्रमाचा ऐतिहासिक क्षण*

दि. ०८ फेब्रुवारी २०२६ रोजी भरडधान्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी, विशेषतः आदिवासी भागातील नाचणी पिकाला जागतिक स्तरावर प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने प्रसिद्ध आचारी विष्णु मनोहर यांच्या हस्ते ११११ किलो नाचणीचा शिरा तयार करून विश्वविक्रम घडविण्यात येणार आहे.

कृषी संस्कृती आणि स्थानिक उत्पादनांना जागतिक ओळख मिळवून देणाऱ्या ‘कोया कृषी कुंभ’ या ऐतिहासिक व विश्वविक्रमी क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधव व नागरिकांनी रविवार, दि. ०८ फेब्रुवारी २०२६ रोजी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version