
(नंदुरबार) ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिलांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण केली आहे, परंतु तांत्रिक माहिती भरताना चूक झाली आहे, अशा महिलांना आता माहिती सुधारण्याची 31 मार्च, 2026 पर्यंत संधी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करताना काही महिलांकडून कुटुंबातील सदस्यांच्या नोकरीविषयक माहितीबाबत (उदा. सरकारी कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी किंवा निवृत्तीवेतनधारक) नजरचुकीने चुकीचा पर्याय निवडला गेला आहे. यामुळे अशा लाभार्थ्यांच्या पात्रतेवर परिणाम होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने योजनेच्या पोर्टलवर सुधारणा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. दुरुस्तीची अंतिम मुदत 31 मार्च 2026 असून ज्यांनी 31 डिसेंबर, 2025 पर्यंत ई-केवायसी (e-KYC) केले आहे आणि ज्यांच्याकडून पर्यायांची निवड करताना चूक झाली आहे, अशाच महिलांना योजनेच्या अधिकृत पोर्टलवर ही सुधारणा करता येईल.
जिल्ह्यातील संबंधित महिलांनी या संधीचा लाभ घेऊन मुदतीत आपली ई-केवायसी (e-KYC) माहिती अचूक करून घ्यावी. यानंतर कोणत्याही परिस्थितीत सुधारणेसाठी मुदतवाढ दिली जाणार नाही, असेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. पाटील यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.