नंदुरबार जिल्ह्यातील विविध आदिवासी भाषांचे संरक्षण, डिजिटल जतन आणि भविष्यातील पिढ्यांपर्यंत त्या भाषांचा वारसा पोहोचवण्यासाठी BHASHINI प्रकल्पांतर्गत ट्रायबल दान हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात यशस्वीपणे पार पडला. कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट जिल्ह्यातील तंत्रज्ञान-समज असलेल्या व्यक्तींची ओळख पटवणे जे आपली आदिवासी भाषा, ज्ञान, शब्दकोश, पारंपरिक शब्दप्रयोग BHASHINI प्रकल्पासाठी देऊ शकतील.
मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी (IAS) यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी भाषिक विविधतेचे डिजिटल संवर्धन करण्यासाठी एक भक्कम पाऊल ठरला आहे.
BHASHINI म्हणजे काय?
भारत सरकारने सुरू केलेला एक राष्ट्रीय डिजिटल प्रकल्प, ज्याचा उद्देश भारतातील प्रत्येक भाषा डिजिटल स्पेसमध्ये आणणे, स्थानिक भाषांमध्ये ए.आय. आधारित सेवा उपलब्ध करणे आणि भाषा-आधारित तंत्रज्ञान सर्वांच्या पोहोचेत देणे हा आहे.
कार्यक्रमाची सुरुवात स्थानिक भाषांच्या पारंपारिक गीत सादरीकरणांतून केली गेली. उमा ठाकरे यांनी स्थानिक आदिवासी भाषेत एक अप्रतिम काव्य सादर केले, ज्यामुळे जमातींच्या भाषिक वारशाची सौंदर्यपूर्ण झलक सर्वांना पाहायला मिळाली. तसेच, नवापूरच्या अंगणवाडी सेविकांनी पारंपरिक आदिवासी लोकगीत गायन करून उपस्थितांचे मन जिंकले. या दोन्ही सादरीकरणांनी ‘ट्रायबल दान’ उपक्रमाचा मुख्य हेतू—स्थानिक भाषा, संस्कृती आणि तोंडी परंपरा डिजिटल स्वरूपात जतन करून पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे—याला अधिक बळ दिले.
कार्यक्रमातील प्रमुख मुद्दे:
BHASHINI च्या तज्ज्ञ टीममधील त्रिशा, सृष्टी आणि विशद यांनी 80 सहभागींचे मार्गदर्शन केले. त्यांनी AI, कृत्रिम बुद्धिमत्ता कशी काम करते, आणि भाषा डेटा का महत्त्वाचा असतो?, BHASHINI, ट्रायबल दान म्हणजे काय?, आदिवासी भाषांना डिजिटल डेटाबेसमध्ये नोंदवण्यासाठी स्थानिक लोकांचा मौल्यवान भाषा–डेटा संकलन उपक्रम यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट केल्या.
ट्रायबल दानची आवश्यकता:
लुप्त होत चाललेल्या आदिवासी भाषा डिजिटल स्वरूपात जतन होतील. प्रत्येक व्यक्तीला कोणतीही भाषा बोलत असला तरी, आरोग्य, शिक्षण आणि सरकारी सेवांची माहिती आपल्या भाषेत मिळेल. AI ऑटो-ट्रान्सलेशनमुळे व्हिडिओ, लेख, आरोग्य मार्गदर्शन, शासकीय माहिती—सर्व आपल्या भाषेत उपलब्ध होईल. उदाहरणार्थ: ‘एखादा व्हिडिओ तुमच्या भाषेत समजत नसेल तर? BHASHINI मुळे तो व्हिडिओ तुमच्या भाषेत एका क्लिकमध्ये उपलब्ध होईल.’
विविधतेने भरलेले सहभागी:
या प्रकल्पासाठी आदिवासी भाषांची बोली, शब्दसंपदा, वाक्यरचना, उच्चार पद्धती याबाबत समृद्ध डेटा मिळावा यासाठी जिल्ह्यातील शिक्षक, महाविद्यालयीन विद्यार्थी, फ्रंटलाइन आरोग्य कर्मचारी,ग्रामपंचायत प्रतिनिधी व ज्येष्ठ नागरिक, गृहिणी व विविध आदिवासी भाषिक समुदायांचे सदस्य यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
तुम्हीही तुमचा BHASHINI मध्ये सहभाग नोंदवू शकता:
https://bhashadaan.bhashini.co.in/bhashadaan/en/home
या कार्यक्रमाचे यशस्वी समन्वयन NITI Aayog Fellow क्षितिजा देशमुख यांनी उत्तम रीतीने सांभाळले.
BHASHINI ट्रायबल दान कार्यक्रमामुळे नंदुरबारची भाषिक ओळख मजबूत होईल. आदिवासी भाषांचे वैज्ञानिक, शास्त्रीय जतन होईल.भविष्यात AI-आधारित सेवा त्यांच्या मूळ भाषेत उपलब्ध होतील.
हा उपक्रम सांस्कृतिक, शैक्षणिक आणि डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने नंदुरबारसाठी एक ऐतिहासिक पाऊल ठरला आहे.
(Bhashini, Tribal Daan, Nandurbar, Digital India, AIForAll, Language Preservation, Tribal Languages)
