
नंदुरबार(प्रतिनिधी):-एस. ए. एम. ट्रस्ट संचलित एस. ए. मिशन इंग्लिश मीडियम हायस्कूल, नंदुरबार येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती तसेच भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे अग्रदूत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेचे प्राचार्य पराग पोळ, वरिष्ठ शिक्षक संदीप पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. फरहाना शेख, शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात इयत्ता पाचवी, सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर प्रभावी भाषणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली. इयत्ता नववीची विद्यार्थिनी कुलश्री वानखेडे हिने लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रप्रेम, शिक्षणविषयक विचार आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदानावर आधारित ओजस्वी भाषण केले. तसेच इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी लघुनाटिका सादर करून त्यांच्या कार्याचा परिचय प्रभावीपणे करून दिला. याप्रसंगी प्राचार्य पराग पोळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनातील संघर्ष, समाजकार्य राष्ट्रसेवा आणि विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात अंगीकारावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन इयत्ता नववीच्या विद्यार्थिनी कार्तिकी रमेश पाटील आणि प्राप्ती सागर पटेल यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. फरहाना शेख मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभागातील सदस्य तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.