Home महाराष्ट्र राहुरी व बारामती विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक जाहीर

राहुरी व बारामती विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक जाहीर

By-elections announced for Rahuri and Baramati assembly constituencies

मुंबई: भारत निवडणूक आयोगाने देशातील सहा राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील राहुरी (जि. अहिल्यानगर) आणि बारामती (जि. पुणे) या दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

राहुरी मतदारसंघाचे आमदार शिवाजी भानुदास कर्डिले आणि बारामती मतदारसंघाचे आमदार अजित अनंतराव पवार यांच्या निधनामुळे या जागा रिक्त झाल्या असून त्यासाठी ही पोटनिवडणूक घेतली जाणार आहे.

निवडणूक आयोगाने या निवडणुकांसाठी आवश्यक कार्यक्रम जाहीर केला असून मतदानासाठी सर्व मतदान केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) आणि व्हीव्हीपॅट (VVPAT) यांचा वापर करण्यात येणार आहे.

मतदारांची ओळख पटवण्यासाठी मतदार फोटो ओळखपत्र (EPIC) हा मुख्य पुरावा असेल. याशिवाय आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, बँक किंवा पोस्ट ऑफिस पासबुक, मनरेगा जॉब कार्ड, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड आदी कागदपत्रेही ग्राह्य धरली जाणार आहेत.

दरम्यान, निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राहुरी आणि बारामती मतदारसंघात आचारसंहिता तत्काळ लागू झाली आहे. तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची माहिती उमेदवार आणि राजकीय पक्षांनी प्रचार काळात तीन वेळा प्रसिद्ध करणे बंधनकारक असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

भारत निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार मतदान 23 एप्रिल 2026 रोजी होणार असून मतमोजणी 4 मे 2026 रोजी केली जाणार आहे.

जाहीर कार्यक्रमानुसार 30 मार्च 2026 (सोमवार) रोजी निवडणुकीसाठी राजपत्र अधिसूचना जारी केली जाईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 6 एप्रिल 2026 (सोमवार) निश्चित करण्यात आली आहे. दाखल झालेल्या अर्जांची छाननी 7 एप्रिल 2026 (मंगळवार) रोजी होणार आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 9 एप्रिल 2026 (गुरुवार) आहे. त्यानंतर संबंधित मतदारसंघांमध्ये 23 एप्रिल 2026 (गुरुवार) रोजी मतदान पार पडेल.

मतदानानंतर 4 मे 2026 (सोमवार) रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. तर संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 6 मे 2026 (बुधवार) पर्यंत पूर्ण केली जाणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने सर्व यंत्रणांना आवश्यक तयारी करण्याच्या सूचना दिल्या असून आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

error: Content is protected !!
Exit mobile version