Home नंदुरबार जिल्हा जिल्ह्यातील 66 ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक;29 एप्रिल रोजी होणार मतमोजणी

जिल्ह्यातील 66 ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक;29 एप्रिल रोजी होणार मतमोजणी

By-elections to 66 Gram Panchayats in the district; Counting of votes will be held on April 29

नंदुरबार जिल्ह्यातील रिक्त झालेल्या 66 ग्रामपंचायत सदस्यांच्या आणि थेट सरपंचांच्या जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, जिल्हा प्रशासनाने मतमोजणीची ठिकाणे आणि वेळ निश्चित केली आहे. या पोटनिवडणुकीसाठी 28 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून, दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 29 एप्रिल रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. अशी माहिती उपजिल्हाधिकारी (प्रशासन) प्रमोद भामरे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.

मतदान आणि मतमोजणीचा वेळ

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, जिल्ह्यातील अक्कलकुवा, अक्राणी, तळोदा, शहादा आणि नवापूर या पाच तालुक्यांमधील 66 ग्रामपंचायतींमध्ये ही पोटनिवडणूक होत आहे. मंगळवारी, 28 एप्रिल रोजी सकाळी 07:30 ते सायंकाळी 05:30 वाजेपर्यंत मतदान पार पडेल. त्यानंतर बुधवारी, 29 एप्रिल रोजी सकाळी 10:00 वाजेपासून संबंधित तहसील कार्यालयांमध्ये मतमोजणीला सुरुवात होईल.

तालुकानिहाय मतमोजणीची ठिकाणे:

अक्कलकुवा तालुका- तहसिल कार्यालय, अक्कलकुवा

अक्राणी तालुका- तहसिल कार्यालय, अक्राणी (मिटींग हॉल)

तळोदा तालुका- तहसिल कार्यालय, तळोदा

शहादा तालुका- शहादा तहसिल कार्यालय ‘तापी’ सभागृह

नवापूर तालुका- तहसिल कार्यालय, नवापूर

प्रशासनाची तयारी पूर्ण

निधन, राजीनामा किंवा अनर्हता यामुळे रिक्त झालेल्या जागांसाठी ही निवडणूक पारंपारिक पद्धतीने घेतली जात आहे. यासंदर्भात सर्व तहसीलदारांना सूचना दिल्या असून, मतमोजणीनंतर तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेशही दिले असल्याचे उपजिल्हाधिकारी श्री. भामरे यांनी या शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version