Home प्रॉपर्टी मुंबईतील पुनर्विकासाचे प्रश्न, पायाभूत सुविधा, रेल्वे आणि केंद्र सरकारच्या जमिनींवरील प्रलंबित प्रश्नांबाबत केंद्र सरकार...

मुंबईतील पुनर्विकासाचे प्रश्न, पायाभूत सुविधा, रेल्वे आणि केंद्र सरकारच्या जमिनींवरील प्रलंबित प्रश्नांबाबत केंद्र सरकार सकारात्मक – उपसभापती सचिन अहिर

0
Central Government positive regarding issues of redevelopment in Mumbai, infrastructure, railways, and pending matters concerning Central Government lands – Deputy Chairman Sachin Ahir.

मुंबई : मुंबईतील केंद्र सरकारच्या अखत्यारीतील जमिनींवरील प्रलंबित पुनर्विकास प्रकल्प, मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जमिनीवरील रखडलेले प्रकल्प, केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग, रेल्वेच्या जमिनी, मिठागरांचा (सॉल्ट पॅन) विकास आणि पायाभूत सुविधांच्या विविध प्रश्नांवर महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळासोबत नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. उपसभापतीपदी निवड झाल्यानंतर सचिन अहिर यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा होता. याबाबत त्यांनी विधान भवन येथील विधिमंडळ पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली.

उपसभापती सचिन अहिर यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह खासदारांच्या शिष्टमंडळासोबत लोकसभेचे अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांची सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, वाणिज्य मंत्री पियुष गोयल, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह, बंदरे व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल आणि आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेऊन मुंबई व महाराष्ट्रातील विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा केली.

गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत, मुंबईतील राज्य व केंद्र सरकारच्या जमिनींवरील पुनर्विकासासाठी वेगवेगळ्या नियमांमुळे अडचणी येत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. संपूर्ण शहरासाठी एक पुनर्विकास धोरण असावे, अशी मागणीही त्यांनी केली. कुलाबा, बॅलार्ड पिअर परिसरातील हजारो झोपड्या व मोडकळीस आलेल्या सेस इमारतींचा पुनर्विकास एनओसीअभावी रखडला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी लवकरच स्वतंत्र उच्चस्तरीय बैठक घेण्याचे निश्चित झाले.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी झालेल्या चर्चेत सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकातील सुविधांसह मुंबई उपनगरीय रेल्वेतील महालक्ष्मी आणि प्रभादेवी स्थानकांच्या उन्नतीकरणाबाबत लवकरच महत्त्वाची बैठक होणार असल्याचे आश्वासन रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिल्याचे अहिर म्हणाले. वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांच्याशी सूतगिरण्यांमधील उत्पादन व कामगारांच्या थकीत वेतनावर अर्धा तास चर्चा झाली. एनटीसीच्या ताब्यातील बंद गिरण्यांच्या जमिनी कामगारांच्या पुनर्वसनासाठी ‘म्हाडा’कडे हस्तांतरित करण्याबाबत आणि चाळीतील रहिवाशांच्या पुनर्वसनावर सकारात्मक चर्चा झाली. हा विषय केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मांडण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले.

मिठागरांच्या (सॉल्ट पॅन)जमिनींबाबत निर्णय घेताना पर्यावरणतज्ज्ञ व स्थानिकांना विश्वासात घेणे गरजेचे असल्याचे सांगत, या जमिनी राज्य सरकारकडे हस्तांतरित झाल्यास तिथे प्रकल्पग्रस्त, बेघर, गिरणी कामगार व वंचितांसाठी परवडणारी घरे उभारण्याची मागणी अहिर यांनी केली. दिल्ली दौऱ्यादरम्यान उपसभापती अहिर यांनी केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या पुढाकाराने आयोजित आरोग्यविषयक कार्यक्रमात भाग घेतला. तसेच आयुष मंत्रालयाच्या योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांना व्हावा यासाठी त्याचा प्रचार प्रसार अधिक व्हावा, अशी सूचना केली.

तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले. या शिष्टमंडळात उपसभापती सचिन अहिर यांच्यासोबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, खासदार संजय पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार श्रीरंग बारणे आदी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.