
पर्यावरण संवर्धन, हवामान बदलाशी लढा आणि ग्रामीण रोजगार निर्मिती या त्रिसूत्रीवर महाराष्ट्रातील हरित क्षेत्र वाढविण्यासाठी २०२६ ते २०३१ या कालावधीत ३०० कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घ्यावा. वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात या क्षेत्रातील तज्ज्ञ, स्वयंसेवी संस्था याच्याबरोबरच स्टार्टअपचा सहभाग घ्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.
राज्यातील वनक्षेत्र ३३ टक्के करण्यासाठी मिशन मोडवर हा कार्यक्रम हाती घ्यावा. या कार्यक्रमाच्या समन्वयासाठी हरित महाराष्ट्र प्राधिकरण स्थापन करण्यासाठीचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करावा. शासकीय विभाग, विविध संस्थाबरोबरच या विषयातील स्टार्टअपचा सहभाग या मोहिमेसाठी घ्यावा. स्टार्टअपची इकोसिस्टीम तयार करून रोजगार निर्मिती करता येईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुख्यमंत्र्यांचे वरिष्ठ आर्थिक सल्लागार तथा मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, नगरविकास (२) विभागाचे अपर मुख्य सचिव के. एच गोविंदराज, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी, मृद व जलसंधारण सचिव गणेश पाटील, प्रधान मुख्य वन संरक्षक (वन बल प्रमुख) श्रीनिवास राव, प्रधान मुख्य वन संरक्षक (सामाजिक वनीकरण) विवेक खांडेकर, महाराष्ट्र रिमोट सेन्सिग अप्लिकेशन सेंटरचे (एमआरएसएसी) चे संचालक श्री. कोलते आदी उपस्थित होते.