Home शेती नागरिकांनी कृषि, पशुसंवर्धन व मिनी सरस वर्धीनी महोत्सवाचा लाभ घ्यावा

नागरिकांनी कृषि, पशुसंवर्धन व मिनी सरस वर्धीनी महोत्सवाचा लाभ घ्यावा

Citizens should take advantage of the agriculture, animal husbandry and mini Saras Vardhini festival

महोत्सवात शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन

 कृषि योजना, निविष्ठा, योजना, देखाव्यांचे 200 स्टॉल

 शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेला माल थेट खरीदीची संधी

वर्धा, दि.21 (जिमाका) : वर्धा शहरातील स्वावलंबी विद्यालयाच्या मैदानावर दि.23 ते 27 जानेवारी दरम्यान जिल्हास्तरीय कृषि, पशुसंवर्धन व मिनी सरस वर्धीनी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात कृषि तज्ञांकडून आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन मिळणार आहे. आधुनिक कृषि निविष्ठांसोबत शेतीशीसंबंधित अवजारे, शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या मालाची थेट विक्री असे अनेक उपयुक्त उपक्रम आयोजित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नागरीक, शेतकऱ्यांनी प्रदर्शनीला भेट देऊन लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केले आहे.

कृ‍षि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, पशुसंवर्धन विभाग, उमेद व कृषि विभागाच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पाच दिवस चालणाऱ्या कृषि महोत्सवात 200 स्टॉल राहणार आहे. महोत्सवाचे दि.23 जानेवारी रोजी उद्घाटन होईल. दुसऱ्या दिवसपासून सलग तीन दिवस शेतकऱ्यांसाठी परिसंवादाचे आयेाजन करण्यात आले आहे. पाचव्या दिवशी शेतकऱ्यांचा सन्मान व महोत्सवाचा समारोप होणार आहे.

महोत्सवात कृषि विषयक विकसित तंत्रज्ञान व शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. शेतकरी, शास्त्रज्ञ आणि संसाधन विस्तार, शेतकरी विपणन साखळी सक्षमीकरण, समुह गट संघटीत करुन स्थापित शेतकरी उत्पादक कंपन्याची क्षमता बांधणी करणे, शेतकऱ्यांच्या उत्पादनास योग्य भाव, ग्राहकांना उच्च दर्जाच्या मालाची उपलब्धता. शेतकरी ते ग्राहक थेट विक्री श्रृंखला, कृषि विषयक परिसंवाद, व्याख्यानाच्या माध्यमातून विचारांच्या देवाणघेवाणीद्वारे शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करणे, विक्रेता, खरेदीदार संमेलनाच्या माध्यमातून बाजारभिमुख कृषि उत्पादनास आणि विपणनास चालना देण्यात येणार आहे.

महोत्सवात विविध शासकीय योजनेचे 40 स्टॉल, विविध कृषि निविष्ठाधारकांचे 40 स्टॉल, खाद्य पदार्थाचे 15 स्टॉल, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेचे 20 स्टॉल, सुक्ष्मसिंचन 3, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक गट 40, विविध योजनांचा प्रत्यक्ष देखावा 10, महिला बचत गटाद्वारे उत्पादित साहित्याचे 15 स्टॉल, इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतमाल विक्रीचे 20 स्टॉल, कृषि यांत्रिकीकरण व रोपवाटीका 8 स्टॉल असे एकुण 200 स्टॉल राहणार आहे.

जिल्ह्यातील हवामान, पिक पध्दती, कृषि प्रक्रिया उद्योग, पुरक व्यवसाय, शासनाचे कृषि विषयक धोरण, आधुनिक तंत्रज्ञान, यांत्रिकीकरण, कृषि क्षेत्रातील निर्यातीच्या संधी व कागदपत्रे प्रक्रिया, कृषि माल मुल्यवर्धन प्रक्रिया तसेच कृषि संलग्न विभागातील महत्वपूर्ण विषयावर संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यात शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले उत्कृष्ट दर्जाचे तुर दाळ, मुंग, हळद, मसाले पदार्थ, तिळ, सेंद्रीय गुळ, तसेच भाजीपाला, फळे आदी विक्रीस उपलब्ध असणार आहे. या महोत्सवाचा लाभ अधिकारी, कर्मचारी, शहरातील ग्राहकांनी घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी जिल्ह्यातील नागरिक, शेतकरी यांना केले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version