Home महाराष्ट्र त्रुटींवर मात करून जिल्ह्याचे जीवनमान उंचावण्यासाठी वचनबद्ध;आरोग्य, शिक्षण आणि पाण्याला प्राधान्य

त्रुटींवर मात करून जिल्ह्याचे जीवनमान उंचावण्यासाठी वचनबद्ध;आरोग्य, शिक्षण आणि पाण्याला प्राधान्य

Committed to improving the quality of life of the district by overcoming shortcomings; Prioritizing health, education and water

(नंदुरबार) जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी असलेल्या त्रुटींवर मात करून आरोग्य, शिक्षण आणि पाणीपुरवठ्याच्या प्रश्न प्राधान्याने सोडविण्यावर भर देण्याच्या सूचना आज राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या आहेत.

ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विविध विभागांच्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना करत बोलत होते. यावेळी आमदार सर्वश्री चंद्रकांत रघुवंशी, शिरीष नाईक, राजेश पाडवी, आमश्या पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस., सहाय्यक जिल्हाधिकारी अनय नावंदर, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, निवासी उपजिल्हाधिकारी आशा संगवी व विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी स्पष्ट केले की, नंदुरबारसारख्या आदिवासी बहुल जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मूलभूत सुविधांची मजबुती अत्यंत आवश्यक आहे. आरोग्य सेवांमध्ये गुणवत्तापूर्ण उपचार सुविधा, ग्रामीण भागात वैद्यकीय मनुष्यबळाची उपलब्धता आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बळकटीकरण यावर विशेष भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. नागरिकांना वेळेत आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट असावे, असे त्यांनी अधोरेखित केले.

शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शाळांमधील पायाभूत सुविधा, डिजिटल शिक्षण साधने आणि शिक्षकांची उपस्थिती याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासकीय योजनांचा प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक असून, शाळाबाह्य मुलांची संख्या शून्यावर आणण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी सांगितले.

पाणीपुरवठा हा जिल्ह्यातील महत्त्वाचा प्रश्न असल्याचे नमूद करत त्यांनी पाणीटंचाई निवारणासाठी दीर्घकालीन उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले. जलसंधारण प्रकल्प, पिण्याच्या पाण्याच्या योजना आणि टँकर व्यवस्थापन यामध्ये पारदर्शकता व कार्यक्षमता राखण्यावर त्यांनी भर दिला. ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित व शुद्ध पाणी उपलब्ध करून देणे तसेच शेतापर्यंत सिंचन सुविधा देणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रलंबित कामे तत्काळ पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना ठोस वेळापत्रक देण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच, शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी समन्वय वाढविण्यावर भर देण्यात आला.

बैठकीत प्रशासनातील कार्यक्षमतेला गती देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे, नागरिकांशी संवाद अधिक प्रभावी करणे आणि तक्रार निवारण प्रणाली सक्षम करणे यावरही चर्चा झाली. सर्व विभागांनी एकत्रितपणे काम करत जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

पालकमंत्री मुश्रीफ यांनी पुढील काळात अधिक जोमाने काम करण्याचे आवाहन केले. “नंदुरबार जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हा केवळ शासनाचा नव्हे, तर प्रत्येक अधिकाऱ्याचा आणि कर्मचाऱ्याचा सामूहिक संकल्प आहे. त्रुटींवर मात करून नागरिकांचे जीवनमान उंचावणे हेच आपले ध्येय असले पाहिजे,” असे सांगत त्यांनी बैठकीचा समारोप केला.

यांचा घेतला आढावा…

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत विविध महत्त्वाच्या विभागांचा सर्वंकष आढावा घेण्यात आला. यामध्ये मुख्यमंत्री बळीराजा योजना, जिल्हाधिकारी कार्यालयाचा एकूण आढावा, पोलीस विभाग, कृषी विभागाच्या राज्य व केंद्र शासनाच्या योजनांची अंमलबजावणी, जिल्हा परिषदेकडील विविध योजनांची प्रगती, तसेच आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. याशिवाय आरोग्य विभाग, वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हास्तरीय विद्युत वितरण नियंत्रण स्वच्छ भारत अभियानाची अंमलबजावणी, पाणीटंचाई व पिण्याच्या पाण्याच्या उपाययोजना, तसेच आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाची तयारी यांचा आढावा घेण्यात आला. नगर विकास विभागाच्या योजनांबरोबरच वन विभागाच्या विविध प्रकल्पांचेही सादरीकरण करण्यात आले. या सर्व विभागांच्या कामकाजाचा सखोल आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.

error: Content is protected !!
Exit mobile version