Home महाराष्ट्र संस्कृती, मराठी भाषा आणि तंत्रज्ञानाचा समन्वय काळाची गरज – मंत्री ॲड.आशिष शेलार

संस्कृती, मराठी भाषा आणि तंत्रज्ञानाचा समन्वय काळाची गरज – मंत्री ॲड.आशिष शेलार

Coordination of culture, Marathi language and technology is the need of the hour – Minister Adv. Ashish Shelar

मुंबई: सार्वजनिक उत्सव, व्याख्यानमाला आणि सांस्कृतिक उपक्रम हे समाज, संस्कृती, राष्ट्र आणि एकता यांना एकत्र आणणारे प्रभावी माध्यम आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या दीर्घ परंपरेप्रमाणेच बौद्धिक समृद्धी देणाऱ्या व्याख्यानमालांची परंपरा शासनाने पुढे नेण्याचा निर्णय घेतला असून, त्यातील हा पहिला उपक्रम आहे, असे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार म्हणाले.सांस्कृतिक कार्य विभागाच्या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेचा शुभारंभ सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत रवींद्र नाट्यमंदिर येथे झाला. या व्याख्यानमालेच्या उद्घाटनपर भाषणात ते बोलत होते. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर, ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि अभ्यासक अच्युत गोडबोले, सल्लागार समितीचे सदस्य, डॉ. शिरीष ठाकूर आणि सोनिया परचुरे यावेळी उपस्थित होते.

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावावर भाष्य करताना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार म्हणाले की, आज प्रत्येक नागरिकाचा तंत्रज्ञानाशी थेट संबंध आहे. मोबाईल, सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सद्वारे मोठ्या प्रमाणावर माहिती संकलित होत असून, या तंत्रज्ञानाचा योग्य, सुरक्षित आणि सकारात्मक वापर कसा करायचा हे समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. या विषयावर अच्युत गोडबोले यांच्यासारख्या अभ्यासू वक्त्यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गडकिल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळवून देण्याच्या प्रक्रियेचा उल्लेख करताना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या सक्रिय प्रयत्नांमुळे हा ऐतिहासिक निर्णय शक्य झाला. महाराजांची ‘रयतेचा राजा’ आणि ‘उपभोगशून्य स्वामी’ ही संकल्पना जागतिक स्तरावर मांडण्यात महाराष्ट्राला यश आले, याचा अभिमान असल्याचेही ते म्हणाले.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर साहित्य, लोककला, लोकसंगीत, विज्ञान, तंत्रज्ञान आणि विविध क्षेत्रांतील मराठी निर्मितीला चालना देण्यासाठी राज्यशासन कटिबद्ध असल्याचे मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले. राज्यात वर्षभरात १२०० हून अधिक सांस्कृतिक कार्यक्रम राबविले जात असून, ही महाराष्ट्राची सांस्कृतिक ‘सॉफ्ट पॉवर’ असल्याचेही त्यांनी नमूद केले.

पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक जोगळेकर म्हणाल्या की, गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानंतर संपूर्ण राज्यभर वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून व्याख्यानमाला हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या व्याख्यानमालेंतर्गत ज्येष्ठ लेखक, विश्लेषक व अभ्यासक अच्युत गोडबोले ‘ए आय तंत्रज्ञान व कलाविश्व’ या विषयावर संवाद साधला. २३ जानेवारी रोजी पुरातत्वशास्त्रज्ञ आणि पुरातत्व व वस्तूसंग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे ‘ छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या युनेस्को नामांकनाचा रोमांचक प्रवास’ आणि २४ जानेवारी रोजी मराठी भाषा विभाग व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी ‘ अभिजात मराठी : इतिहास वर्तमान व भविष्य ‘ या विषयांवर संवाद साधणार आहेत.

error: Content is protected !!
Exit mobile version