
महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून बाल हक्क, बाल संरक्षण आणि बालकांशी संबंधित कायदे व यंत्रणांबाबत व्यापक जनजागृती करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने गणेशोत्सव मंडळांना केले आहे.
बालकांना शिक्षण, सुरक्षितता, सन्मानाने जगणे आणि शोषणापासून संरक्षणाचा हक्क आहे. बाल लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम, बालविवाह प्रतिबंध, बालमजुरी, बाल तस्करी तसेच बालकांवरील अत्याचार व शोषण याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घ्यावा, असे आयोगाने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
या अभियानाद्वारे बाल कल्याण समिती, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, विशेष बाल पोलीस पथक, बाल हेल्पलाईन, बाल संरक्षण सेवा तसेच महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या ‘चिराग’ ॲप आणि तक्रार निवारण व्यवस्थेची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गणेशोत्सव काळात बालकांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी निबंध लेखन, चित्रकला, पोस्टर मेकिंग, घोषवाक्य लेखन, वक्तृत्व आणि बाल हक्क विषयक जनजागृतीपर उपक्रम आयोजित करण्यासही गणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहन देण्यात येत आहे.