Home नंदुरबार जिल्हा देवगिरी विभागीय फेरी – भगवान बिरसा कला संगम 2025 कात्री गावातील ज्येष्ठ...

देवगिरी विभागीय फेरी – भगवान बिरसा कला संगम 2025 कात्री गावातील ज्येष्ठ कलाकारांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड — नंदुरबारचा अभिमान!

क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 वी जयंतीनिमित्त आयोजित ‘भगवान बिरसा कला संगम 2025’ या राज्यस्तरीय कला स्पर्धेची देवगिरी विभागीय फेरी नंदुरबार येथे उत्साहात पार पडली. स्पर्धेची सुरुवात हिरवा देव, धरतरी माता व भगवान बिरसा मुंडा यांच्या पूजनाने झाली. कार्यक्रमात प्रकल्प अधिकारी श्री. चंद्रकांत पवार, सहसंघटन मंत्री गणेश गावित, देवगिरी कल्याण आश्रमचे सहसचिव विरेंद्र वळवी, सूर्यदर्शन संस्थेचे अध्यक्ष संदीप वळवी, तसेच आदिवासी रूढी परंपरा विसरवाडी अध्यक्ष ईश्वर गावित उपस्थित होते.

या भव्य स्पर्धेत ५०० हून अधिक स्पर्धकांनी आपल्या कलांच्या माध्यमातून आदिवासी संस्कृती, परंपरा आणि वारसा यांचे अप्रतिम दर्शन घडविले.

या फेरीत कात्री गावातील ज्येष्ठ कलाकार निंबा मनजा वळवी (पिरि वाद्य) यांनी दुसरा क्रमांक, तर हाना दोहऱ्या वळवी (मोडवी सुंको वाद्य) यांनी तिसरा क्रमांक मिळवून देवगिरी विभागात विशेष यश संपादन केले आहे. या दोन्ही कलाकारांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे.

हा कार्यक्रम सूर्यदर्शन कै. मोहन दादा वळवी बहुउद्देशीय संस्था, कात्री यांच्या आयोजनाखाली पार पडला. संस्थेचे अध्यक्ष श्री. संदीप दादा वळवी यांनी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या दोन्ही कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या.

राज्यस्तरीय स्पर्धा १५ नोव्हेंबर २०२५ रोजी नागपूर येथे, भगवान बिरसा मुंडा जयंती व जनजाती गौरव दिनानिमित्त होणार असून, कात्री गावातील कलाकारांचा समूह १३ नोव्हेंबर रोजी नागपूरकडे रवाना होणार आहे.

कलासंगमाचा उद्देश — परंपरा, ओळख आणि अभिमान जपणं!

भगवान बिरसा कला मंच, प्रगती प्रतिष्ठान (जव्हार) आणि महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. महाराष्ट्रातील सर्व ४७ जनजातींच्या नृत्य, गायन, वाद्य वादन, चित्रकला आणि हस्तकला या कलाप्रकारांना व्यासपीठ मिळावे, त्यांच्या परंपरांचे योग्य दस्तऐवजीकरण व्हावे आणि या कला जागतिक स्तरावर पोहोचाव्यात, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

महाराष्ट्रभरातून १० हजार कलाकारांची नोंदणी:

या राज्यव्यापी कला उपक्रमाला जबरदस्त प्रतिसाद मिळत असून, महाराष्ट्रातील १०,००० पेक्षा अधिक कलाकारांनी विविध श्रेणींमध्ये नोंदणी केली आहे. निवड झालेल्या कलाकारांना नागपूर येथे मुख्य कार्यक्रमात आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे.

नंदुरबारचा गौरव – कात्री गावाचा अभिमान!

देवगिरी विभागीय फेरीतील हे यश केवळ दोन कलाकारांचे नाही, तर संपूर्ण नंदुरबार जिल्ह्याच्या आदिवासी सांस्कृतिक अभिमानाचे प्रतीक आहे.

राज्यस्तरावरही हे कलाकार आपले कौशल्य प्रदर्शित करून जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

.

.

.

#भगवानबिरसाकलासंगम#Nandurbar#Toranmal#AdiwasiKala#TribalArt#BirsaMunda150#CulturalHeritage#NandurbarPride#TeamNandurbar#CollectorOfficeNandurbar

error: Content is protected !!
Exit mobile version