अमरावती: मेळघाटमध्ये निसर्ग सौदर्य अनुभवण्यासाठी पर्यटक येतात. याठिकाणी असलेल्या पर्यटनस्थळाशिवाय त्यांना जंगलातील भ्रमंती आणि निसर्गाशी एकरूप होण्याची सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. यासाठी ट्रॅक आणि ट्रेलसाठी मार्ग शोधण्यात येतील, यातून मेळघाटातील पर्यटनाचा विकास साधण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.
मेळघाटातील पर्यटनाबाबत मेळघाट ॲडव्हेंचर क्लबने जिल्हाधिकारी कार्यालयात सादरीकरण केले. विदर्भातील वन पर्यटनामध्ये मेळघाट हा उत्तम पर्याय आहे. याठिकाणी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पर्यटनस्थळांच्या विकासासोबतच पर्यटनाचे विविध पर्याय देणे आवश्यक आहे. जंगल सफारी, साहसी पर्यटन यासह जंगल भ्रमंती हा पर्यायही देणे आवश्यक आहे. यासाठी वन विभागाने पर्यटकांची सुरक्षितता लक्षात घेऊन ट्रेकिंगसाठी मार्ग निवडावेत. आवश्यकता पडल्यास याठिकाणी स्वतंत्र गेट उभारण्यात यावे. याप्रकारचे पर्याय दिल्यास पर्यटक मेळघाटात थांबण्यास तयार होतील.
मेळघाटातील पर्यटनाबाबत युवकांना लक्ष ठेऊन समाजमाध्यमांवरून प्रसिद्धी करावी. यामुळे मेळघाटबाबत माहिती होण्यास मदत मिळणार आहे. शालेय विद्यार्थी आणि समूहाने येणारे पर्यटकांवर लक्ष केंद्रीत करावे. त्यांच्यासाठी निवास, फिरणे आणि जेवणाची उत्तम व्यवस्था उभारणे आवश्यक आहे. पर्यटकांच्या निवासाची व्यवस्था उत्तम दर्जाची असावी. याठिकाणी स्वच्छता आणि निटनेटकेपणा असणे आवश्यक आहे. सेमाडोह आणि कोलकास येथे राहण्याची व्यवस्था आहे. याठिकाणांची देखभाल, दुरूस्ती सातत्याने करावी. इतर ठिकाणी टेंटमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात येते. हा पर्याययही तपासून पाहण्यात यावा. आमझरी येथे साहसी खेळाची सोय करण्यात आली आहे. येथेही पर्यटक येतील, याचे नियोजन करावे.
सुविधा आणि सवलती दिल्यास त्यांचा मेळघाटातील पर्यटनाकडे कल वाढू शकेल. यासाठी पर्यटनाचे क्षेत्र विस्तारण्याची गरज आहे. धबधबे, ऐतिहासिक वास्तू ही केंद्र ठरवून पर्यटकांना त्याठिकाणी पायी नेण्यासाठी मार्ग तयार करण्यात यावे. या वाटेत नाश्ता, जेवण आदी व्यवस्था झाल्यास पर्यटकांसाठी एक चांगली सुविधा निर्माण होऊ शकेल. वन विभागाने पर्यटकांना राहण्याच्या व्यवस्थेसोबतच जंगल भ्रमंतीसाठी रस्ता शोधावा, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दिले.
