Home महाराष्ट्र दिव्यांग विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्पाने शाळेत स्वागत

दिव्यांग विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्पाने शाळेत स्वागत

0
दिव्यांग विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्पाने शाळेत स्वागत
Differently-abled students welcomed at school with roses.

मुंबई : शाळा प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिव डॉ. माणिक गुरसाळ यांनी ताडदेव येथील व्हिक्टोरिया मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंड या अंध विद्यालयाला भेट देऊन दिव्यांग विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.

डॉ. गुरसाळ यांनी विद्यालयातील विविध वर्गांना भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शाळेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. संवादादरम्यान विद्यार्थ्यांनी डॉ. गुरसाळ यांना आयएएस परीक्षा कशी असते, त्यासाठी कोणती तयारी करावी लागते यासंदर्भात प्रश्न विचारले. डॉ. गुरसाळ यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना अत्यंत सहजतेने उत्तरे देत मार्गदर्शन केले व शैक्षणिक प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे उपसचिव विष्णुदास घोडके, अवर सचिव साईप्रसाद मुकदाडवार, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण तथा सहाय्यक आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण विभाग समाधान इंगळे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी रूपाली पाटील, व्हिक्टोरिया मेमोरियल अंध महाविद्यालयाच्या प्राचार्या रजनी हिरमेठ; तसेच संस्थेच्या अध्यक्षा मीना देशपांडे आदी यावेळी उपस्थित होते.

दृष्टिहीन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शतकाहून अधिक काळ कार्यरत असलेल्या व्हिक्टोरिया मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंड या संस्थेने समाजात शिक्षण आणि स्वावलंबनाचा आदर्श निर्माण केला आहे. सन 1902 मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेत दृष्टिहीन विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासह निवास, भोजन, संगणक प्रशिक्षण, संगीत, क्रीडा आणि विविध व्यावसायिक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते.

मुंबईतील ताडदेव परिसरात असलेल्या या संस्थेने हजारो दृष्टिहीन विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, ग्रंथालय सुविधा; तसेच अन्य विविध कौशल्यविकास कार्यक्रम प्रभावीपणे राबविले जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here