
(नंदुरबार) जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासह नागरिकांच्या सोयीसुविधांचा विचार करून प्रशासन कार्यरत आहे, याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी आज नवापूर तालुक्याचा दौरा करून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 तसेच चिंचपाडा येथील रेल्वे क्रॉसिंग गेट क्रमांक 73 व 74 यांची सविस्तर पाहणी केली.
दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांनी महामार्गावरील सुरू असलेल्या दुरुस्ती व बांधकाम कामांचा आढावा घेतला. रस्त्यावर पडलेले खड्डे तातडीने बुजवावेत तसेच अपूर्ण असलेले काम प्राधान्याने पूर्ण करावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व कंत्राटदारांना दिल्या. नागरिकांच्या दैनंदिन प्रवासात होणारा त्रास लक्षात घेऊन रस्ते वाहतुकीसाठी सुरक्षित आणि सुकर बनविणे हे प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
या भागातील रेल्वे क्रॉसिंग गेट दीर्घकाळ बंद असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या समस्येची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. सेठी यांनी रेल्वे विभागाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून सविस्तर चर्चा केली.
या चर्चेदरम्यान त्यांनी सांगितले की —
“नागरिकांच्या सुरक्षिततेसह प्रवास सुलभता या दोन्ही गोष्टींचा संतुलन साधणे आवश्यक आहे. रेल्वे गेट बंद ठेवण्यामुळे जनतेच्या हालचालींवर मर्यादा येत असल्याने संबंधित विभागांनी तातडीने उपाययोजना आखून आवश्यक नियमानुसार रेल्वे गेट सुरु करण्याची कार्यवाही करावी.”
तसेच वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग, सुरक्षा उपाययोजना आणि स्थानिकांच्या सोयीसाठी संयुक्त नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
या पाहणी दौऱ्यात तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी, रेल्वे विभाग अधिकारी, स्थानिक ग्रामस्थ आणि पंचायत प्रतिनिधी उपस्थित होते.
#Nandurbar#DrMitaliSethi#Navapur#InfrastructureDevelopment#HighwayInspection#RailwayCrossing#PublicSafety#RoadConnectivity#NH6#AdministrationInAction#SmartGovernance#GovernmentOfMaharashtra#NandurbarDistrict