(गडचिरोली) दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या व सामाजिक जीवनाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेऊन त्यांच्या सुप्त गुणांना वाव देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. याच उद्देशाने जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग, जिल्हा परिषद गडचिरोली व जिल्ह्यातील दिव्यांगांच्या विशेष शाळांच्या संयुक्त विद्यमाने ६ व ७ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्हास्तरीय विशेष शालेय दिव्यांग मुला-मुलींच्या दोन दिवसीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन श्वेता कोवे क्रीडा नगरी, पार्वती निवासी मतिमंद विद्यालय, देसाईगंज येथे करण्यात आले.
या स्पर्धांचे उद्घाटन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष लताताई सुंदरकर (नगर परिषद देसाईगंज) होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राहूल काळभोर, तहसीलदार प्रीती डूडुलकर तसेच गटविकास अधिकारी लुमदेव जुवारे उपस्थित होते.
सोहळ्याची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात येऊन क्रीडाध्वजाला सलामी देत स्पर्धांचे विधिवत उद्घाटन करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व खाजगी दिव्यांग शाळांनी या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला. विविध क्रीडा प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेत आपली कौशल्ये सादर केली. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, आत्मविश्वास व उत्साह पाहून उपस्थित मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले.
दोन दिवस चाललेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांना केवळ क्रीडा नव्हे तर कला-कौशल्ये सादर करण्याचीही संधी मिळाली. सायंकाळी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नृत्य, गीत व विविध सादरीकरणांच्या माध्यमातून आपली प्रतिभा दाखवली. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी चेतन हिवंज यांनी केले. स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभागातील अधिकारी-कर्मचारी तसेच जिल्ह्यातील सर्व दिव्यांग शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले, असे जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी चेतन हिवंज यांनी कळविले आहे.
