
६० वर्षांची गौरवशाली पंरपरा असणारे हे महाविद्यालय गुणवत्तेचा प्रवास विस्तारून नवनवीन शिखर गाठेल, असा विश्वास व्यक्त करत समाज परिवर्तनाचे माध्यम म्हणून या महाविद्यालयाने कार्य करावे, अशा अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीक्षाभूमी स्मारक समिती संचलित डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या हिरक महोत्सवी सोहळ्यात व्यक्त केल्या.
कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई तर दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई अध्यक्षस्थानी होते. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती चंद्रशेखर,दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य डॉ. कमलताई गवई , सुधीर फुलझेले,राजेंद्र गवई, प्रदीप आगलावे आदी यावेळी उपस्थित होते.
स्वत:चा विकास साधताना समाजातील मागास घटकांना पुढे घेवून जाण्याचे महान विचार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीयांनी दिले असून या विचारांचा अंगिकार करत विद्यार्थ्यांनी आपले ध्येय गाठावे, असे प्रतिपादन सरन्यायाधिश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी यावेळी केले.
डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या उभारणीत व विकासाठी दादासाहेब गायकवाड,दादासाहेब गवई, दादासाहेब कुंभारे,सदानंद फुलझेले यांचे मोलाचे योगदान असल्याचे सांगून या महाविद्यालयाच्या वाटचालीच्या विविध आठवणींना त्यांनी यावेळी उजाळा दिला. बाबासाहेब आंबेडकराच्या विचारांचा अंगिकार व त्यातून मार्गक्रमण करणे हीच डॉ. आंबेडकर महाविद्यालयासाठी आयुष्य वेचणाऱ्या व्यक्तींना आदरांजली ठरेल असेही त्यांनी सांगितले.