Home नंदुरबार जिल्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व डॉ. एस. आर. रंगनाथन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व डॉ. एस. आर. रंगनाथन

Dr. Babasaheb Ambedkar Excellent Public Library and Dr. S. R. Ranganathan

(नंदुरबार) महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयामार्फत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, जनतेला दर्जेदार ग्रंथालयीन सेवा मिळाव्यात आणि वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने दरवर्षी विविध राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येतात. सन 2025-26 या वर्षासाठी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार’ तसेच ‘डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कारा’साठी विहित नमुन्यात प्रस्ताव मागविण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी ध. बा. वळवी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.

पुरस्काराचे स्वरूप:

उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार: राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील ‘अ’, ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’ वर्गातील उत्कृष्ट ग्रंथालयांना अनुक्रमे ₹ 1 लाख, ₹ 75 हजार ₹ 50 हजार आणि ₹ 25 हजार रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व ग्रंथभेट देऊन गौरविण्यात येते.

राज्यस्तरीय ग्रंथमित्र पुरस्कार: राज्य स्तरावर प्रत्येकी एका उत्कृष्ट कार्यकर्त्यास व एका सेवकास प्रत्येकी ₹ 50 हजार रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व ग्रंथभेट देण्यात येते.

विभागस्तरीय ग्रंथमित्र पुरस्कार: राज्यातील प्रत्येक महसूल विभाग स्तरावर प्रत्येकी एक कार्यकर्ता व एक सेवक यांना प्रत्येकी ₹ 25 हजार रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व ग्रंथभेट देऊन गौरविण्यात येते.

अर्ज सादर करण्याची मुदत:

सन 2025-26 च्या पुरस्कारांसाठी इच्छुक असणारी सार्वजनिक ग्रंथालये, ग्रंथालय कार्यकर्ते व सेवक (ग्रंथमित्र) यांनी आपले विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह 25 सप्टेंबर 2026 पर्यंत ‘जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नंदुरबार’ येथे तीन प्रतींमध्ये सादर करावेत, असेही आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. वळवी यांनी या शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version