Home नंदुरबार जिल्हा ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी करणार-जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप

ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी करणार-जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप

0
Drone technology to be used for maintaining law and order – District Superintendent of Police Ashwini Sanap

नंदुरबार(प्रतिनिधी):-विज्ञान तंत्रज्ञानाच्या या युगात पोलीस दलाच्या विविध कार्यासाठी ड्रोन तंत्रज्ञान अतिशय उपयुक्त ठरणार असून रेवाज एनर्जी व सेलिब्रो स्पार्क या संस्थांच्या सहकार्याने नंदुरबार जिल्हा पोलीस दल जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी या तंत्रज्ञानाचा परिपूर्ण वापर करेल असे प्रतिपादन नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी केले. एकलव्य विद्यालयात पोलीस दलासाठीच्या ड्रोन प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. महाराष्ट्र शासनाने मानवरहित प्रणाली धोरण राबविण्याचे निश्चित केले असून, या धोरणाच्या माध्यमातून विविध प्रकल्प राबवून मानवरहित प्रणालीचे जागतिक हब महाराष्ट्र व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याअंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ड्रोन तंत्रज्ञान सारखे तंत्रज्ञान वापरून वाहतुक नियंत्रण, गुन्हेगारी नियंत्रण, सण उत्सव काळात निघणाऱ्या मिरवणुकीवर तथा अन्य कार्यक्रमावर नियंत्रण असे अनेक हेतू यातून साध्य होतील. रेवाज एनर्जी आणि सेलिब्रो स्पार्क या संस्थानी ड्रोन प्रशिक्षण सारखे उपक्रम नंदुरबार जिल्ह्यात सुरू करणे कौतुकास्पद आहे आणि यातून जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल असे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला रिमोट कंट्रोल च्या सहाय्याने दीप प्रज्वलन करण्यात आले. याचे आयोजन मिलिंद वडनगरे यांनी केले होते. सेरीब्रोज स्पार्कचे संचालक ऋषिकेश सोनवणे यांनी सांगितले की, संस्था 2020 मध्ये स्थापन झाली. त्यानंतर संरक्षण, पोलीस, कृषी, शिक्षण अश्या अनेक क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सेवा पुरवित आहे. त्यांनी ड्रोनचे प्रात्यक्षिक सुद्धा दाखवले. हे तंत्रज्ञान मानवी जीवन सुलभ करते आहे, समाजाच्या विविध क्षेत्रात त्यासाठी आम्ही मदत करू अशी ग्वाही त्यांनी दिली. हे प्रशिक्षण 7 दिवस चालणार असून यात थियरी व प्रात्यक्षिक दोन्हींचा समावेश आहे. याप्रसंगी व्यासपीठावर नंदुरबार जिल्ह्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक कडलग, कल्याण शाखा पोलीस निरीक्षक विवेक पाटील, विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वास पावरा, शहर वाहतूक शाखेचे प्रमुख जगदीश गावित, पश्चिम खांदेश भिल्ल सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ सुहास नटावदकर, सौ सुहासिनी नटावदकर, रेवाज एनर्जी चे संचालक रोहन नटावदकर, जयदीप नटावदकर, सेरीब्रोज स्पार्कचे प्रकल्प व्यवस्थापक विवेक शिरसाठ, विद्यालयाचे मुख्याध्यापक धर्मेंद्र मराठे, नितीन पाटील यांच्यासह प्रशिक्षणार्थी पोलीस व विद्यार्थी तसेच शिक्षक उपस्थित होते.
सूत्रसंचालन संतोष पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन उपमुख्याध्यापक डॉ गिरीश पवार यांनी केले.