Home नंदुरबार जिल्हा शाळेच्या पहिल्याच दिवशी दुर्गम तोरणमाळमध्ये शिक्षणमंत्री दादाजी भुसे करणार नवागतांचे स्वागत

शाळेच्या पहिल्याच दिवशी दुर्गम तोरणमाळमध्ये शिक्षणमंत्री दादाजी भुसे करणार नवागतांचे स्वागत

0
शाळेच्या पहिल्याच दिवशी दुर्गम तोरणमाळमध्ये शिक्षणमंत्री दादाजी भुसे करणार नवागतांचे स्वागत
Education Minister Dadaji Bhuse to welcome newcomers in remote Toranmal on the very first day of school.

(नंदुरबार) शाळेचा पहिला दिवस हा प्रत्येक बालकाच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण असतो. नव्या गणवेशातील उत्साह, हातातली नवी पुस्तके, डोळ्यांतली स्वप्ने आणि शाळेच्या उंबरठ्यावर ठेवलेले पहिले पाऊल… या भावविश्वाचा आनंद अधिक संस्मरणीय करण्यासाठी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी यंदाच्या शाळा प्रवेशोत्सवासाठी नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल तोरणमाळ येथील नेताजी सुभाषचंद्र बोस आवासीय विद्यालयाची निवड केली आहे.

शाळा प्रवेशोत्सव हा केवळ एक शासकीय कार्यक्रम नसून प्रत्येक बालकाच्या शैक्षणिक प्रवासाच्या प्रारंभाचा आनंदोत्सव आहे. या उत्सवात सहभागी होण्यासाठी शिक्षणमंत्र्यांनी जाणीवपूर्वक दुर्गम भागातील विद्यार्थ्यांमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. सामान्यतः अशा कार्यक्रमांसाठी शहरांतील किंवा सहज पोहोचता येणाऱ्या शाळांची निवड केली जाते. मात्र तोरणमाळसारख्या डोंगर-दऱ्यांतील आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळेत जाऊन त्यांचे स्वागत करण्याचा निर्णय हा शासनाच्या संवेदनशीलतेचा आणि शिक्षणावरील दृढ बांधिलकीचा प्रत्यय देणारा आहे.

शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे हे सोमवार, 15 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता नेताजी सुभाषचंद्र बोस आवासीय विद्यालय, तोरणमाळ, ता. धडगाव, जि. नंदुरबार येथे आयोजित शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

शाळेच्या पहिल्या दिवशी नवागत विद्यार्थ्यांचे औक्षण, पुष्पवर्षाव, टाळ्यांच्या गजरात स्वागत, गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वितरण अशा विविध उपक्रमांद्वारे आनंददायी वातावरण निर्माण केले जाणार आहे. यावेळी मंत्री श्री.भुसे विद्यार्थ्यांच्या स्वागताबरोबरच त्यांच्याशी थेट संवाद साधून शिक्षणाची प्रेरणा देणार आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम केवळ स्वागतापुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षणाविषयी आत्मीयता, आत्मविश्वास आणि उज्ज्वल भविष्याची उमेद जागविणारा ठरणार आहे.

तोरणमाळसारख्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शाळेच्या पहिल्या दिवसाच्या आनंदात राज्याचे शिक्षणमंत्री स्वतः सहभागी होत असल्याने हा क्षण विद्यार्थी, पालक आणि स्थानिक नागरिकांसाठी विशेष अभिमानाचा ठरणार आहे. शिक्षणाचा प्रकाश शेवटच्या वाडी-पाड्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संधीपासून कोणतेही बालक वंचित राहू नये, या शासनाच्या भूमिकेचे हे जिवंत उदाहरण मानले जात आहे.

शिक्षणाचा अधिकार, गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी आणि विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देण्याचा शासनाचा संकल्प या कार्यक्रमातून अधिक दृढ होणार असून, ‘प्रत्येक बालक महत्त्वाचे आहे’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देणारा शाळा प्रवेशोत्सव 2026 नंदुरबार जिल्ह्यात प्रेरणादायी ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here