
बुलढाणा : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कृषी, पशुसंवर्धन, उद्योग, महिला सक्षमीकरण आणि डिजिटल सुविधा या विविध क्षेत्रांमध्ये शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनांमुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळत असून समृद्ध, सक्षम आणि सर्वसमावेशक बुलढाणा घडविण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी केले.
पोलिस कवायत मैदान येथे १ मे महाराष्ट्राच्या ६७ व्या स्थापना दिवस व कामगार दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पार पडाला, यावेळी ते बोलत होते. आमदार मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॉ.प्रविणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, पोलिस अधिक्षक निलेश तांबे, अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे, राजेंद्र पोळ, समाधान गायकवाड, स्वातंत्र सेनानी, वीरमाता, वीरपत्नी, ज्येष्ठ नागरिक, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री मकरंद पाटील म्हणाले की, बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांसमोर उभ्या राहिलेल्या अडचणींचा विचार करून शासनाने अवेळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील १ कोटी ५ लाख ९२ हजार शेतकऱ्यांसाठी १६ हजार २२५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, बुलढाणा जिल्ह्यातील ६ लाख २९ हजार शेतकऱ्यांना ८९३ कोटी ३ लाख रुपयांची मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. या मदतीतून कोणतीही बँक वसुली होऊ नये, असे निर्देश शासनाने दिले आहेत.
शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना” जाहीर करण्यात आली असून, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या २ लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जाची माफी होणार आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देऊन शासन त्याच्या सन्मान करणार आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना होणार आहे.
कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी सूक्ष्म सिंचन, शेततळे, फळबाग लागवड आणि अन्न प्रक्रिया उद्योगांना चालना दिली जात आहे. “प्रधानमंत्री किसान सन्मान निधी”योजनेद्वारेही शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य मिळत आहे. पशुसंवर्धन क्षेत्रात “नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन” अंतर्गत चारा विकास प्रकल्प सुरू करण्यात आला असून, शेळीपालन व कुक्कुटपालन प्रकल्पांमुळे ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती होत आहे.
औद्योगिक क्षेत्रात जिल्ह्यात १ लाख १६ हजार ६२८ उद्यम नोंदणी होऊन २ लाख ४८ हजारांहून अधिक रोजगार निर्माण झाले आहेत. निर्यात क्षेत्रात बुलढाणा जिल्हा अमरावती विभागात प्रथम क्रमांकावर असून, जानेवारी २०२६ अखेरपर्यंत ८६८ कोटी रुपयांची निर्यात झाली आहे. नवीन उद्योग, वाढती गुंतवणूक आणि रोजगारनिर्मिती यामुळे जिल्ह्याची आर्थिक घडी अधिक मजबूत होत आहे. मुख्यमंत्री व पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत आपण १०० टक्के लक्षांक पूर्ण केला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
पिण्याच्या पाण्याच्या टंचाईसाठी कृती आराखडा तयार करण्यात आला असून ७२९ गावे टंचाईग्रस्त घोषित करण्यात आली आहेत. सध्या १८ गावांना टँकरद्वारे तर ५९ गावांना विहीर अधिग्रहणातून पाणीपुरवठा केला जात आहे. पर्यावरण संवर्धनासाठी ३०० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
“प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २” अंतर्गत १ लाख ३ हजार ५३७ घरकुलांना मंजुरी देण्यात आली असून, मोठ्या प्रमाणात घरे पूर्ण झाली आहेत. महिला सक्षमीकरणासाठी “उमेद” अभियानांतर्गत २४ हजार स्वयं सहायता समूह स्थापन करून २ लाख २६ हजार कुटुंबांना जोडण्यात आले आहे. तसेच २ लाख ५२ हजारांहून अधिक “लखपती दीदी” निर्माण करण्यात आल्या आहेत.
आरोग्य क्षेत्रात “माझे गाव आरोग्य संपन्न गाव” मोहिमेद्वारे ग्रामस्तरावर आरोग्य सेवा मजबूत करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, वसतिगृहे आणि विविध योजनांद्वारे सामाजिक न्याय विभाग कार्यरत आहे. डिजिटल सेवांमुळे शासन आणि नागरिकांमधील दरी कमी होत असून ऑनलाईन सेवा, सहज प्रणाली आणि चॅटबॉट्समुळे पारदर्शकता वाढत आहे. तसेच “महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण-२०२६” अंतर्गत राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक व रोजगारनिर्मिती होणार आहे.
क्रीडा क्षेत्रात जिल्ह्यातील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवले असून, आर्चरी प्रशिक्षण केंद्रासारख्या सुविधा विकसित करण्यात येत आहेत. पर्यटन विकासासाठी लोणार सरोवर, सिंदखेड राजा आणि शेगाव या स्थळांचा विकास करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
१ मेपासून देशभर “जनगणना २०२६” सुरु होणार असून देशाच्या विकासासाठी जनगणना अत्यंत महत्त्वाची आहे. यावेळची जनगणना आधुनिक आणि डिजिटल पद्धतीने होणार असून जनगणना दोन टप्प्यांमध्ये होणार आहे. पहिल्या टप्प्यात स्वगणना दि. १ ते १५ मे या कालावधीत तर दुसऱ्या टप्प्यात घरगणना दि. १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी अचूक माहिती देत या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन ना. मकरंद पाटील यांनी केले आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पालकमंत्री ना. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. महाराष्ट्र दिनाच्या मुख्य समारंभात पोलीस विभागाने शानदार पथसंचलन केले. कार्यक्रमाचे संचालन मंगेश मोरे यांनी केले.
पोलीस दलात केलेल्या प्रशंसनीय सेवेसाठी पोलीस उपनिरिक्षक सुनिल राऊत व पोलीस हवालदार संजय नागवे यांना सन्मानित करण्यात आले. आदर्श तलाठी पुरस्कार सन 2025-26 साठी ग्राम महसुल अधिकारी अनुराधा लवंगे यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. माहिला व बालविकास विभागांतर्गत जिल्ह्यातल महिला व बालकांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आशा सिरसाठ, रजनी जुळे, वर्षा पालकर व वृषाली बोंदे या महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरण पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने पोलीस विभागासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या २७ नव्या वाहनांचे उद्घाटन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर ही वाहने पोलीस विभागाला हस्तांतरित करण्यात आले.
या वाहनांमध्ये महिला सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या दामिनी पथकांच्या ७ वाहनांचाही समावेश आहे. नव्या वाहनांमुळे पोलीस प्रशासनाची कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार असून आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देणे अधिक सुलभ होणार आहे.