महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत आज दिनांक ३० सप्टेंबर २०२५ रोजी नंदुरबार जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये नागरिकांसाठी विशेष रोजगार शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांचा उद्देश ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना सरकारी योजनांचा थेट लाभ मिळवून देणे आणि स्थलांतर रोखून स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा होता.
या शिबिरांमध्ये नवीन जॉब कार्ड तयार करणे, जॉब कार्डमध्ये नाव समाविष्ट किंवा वगळणे, आधार माहिती अपडेट करणे, जॉब कार्ड विभक्त करणे, स्थलांतर थांबविण्यासाठी उपाययोजना, तसेच ‘सेल्फ वर्क’ संबंधी माहिती देणे अशा विविध सेवा नागरिकांना पुरविण्यात आल्या.
नवापूर तालुक्यातील ग्रामपंचायत बोरचक येथे 7 नवीन जॉब कार्ड जारी करण्यात आले तसेच 4 नावे समाविष्ट करण्यात आली. अंतीपाडा येथे 14 नवीन जॉब कार्ड जारी, 3 नावे समाविष्ट, 2 नावे विभक्त, 1 नाव वगळले आणि 6 आधार मॅपिंग पूर्ण करण्यात आले. बिलदा ग्रामपंचायतीत 2 नवीन जॉब कार्ड जारी, 3 नावे समाविष्ट, 13 जॉब कार्ड विभक्त आणि 7 जॉब कार्ड अद्ययावत करण्यात आले. भवरे येथे 2 नवीन जॉब कार्ड जारी आणि 7 नावे समाविष्ट करण्यात आली. बालआमराई येथे 17 नवीन जॉब कार्ड जारी करण्यात आले असून 9 नावे समाविष्ट करण्यात आली.
तळोदा तालुक्यातील मालदा आणि तुळजा ग्रामपंचायतींमध्ये नवीन जॉब कार्ड जारी करणे, नाव समाविष्ट करणे, आधार कार्ड अद्ययावत करणे आणि स्थलांतर रोखण्यासाठी जनजागृती करण्यासाठी विशेष शिबिरे घेण्यात आली.
नंदुरबार तालुक्यातील श्रीरामपूर ग्रामपंचायतीत नवीन जॉब कार्ड जारी करणे, जॉब कार्ड अद्ययावत करणे, नाव समाविष्ट करणे तसेच ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागावर सेल्फ वर्कची माहिती प्रदर्शित करण्यात आली. घोटाणे येथे नवीन जॉब कार्ड जारी करणे, नाव समाविष्ट करणे आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
अधिकारी व ग्रामस्थांचा सहभाग:
या सर्व शिबिरांमध्ये सरपंच, ग्रामसेवक, ग्राम रोजगार सेवक, CDEO, PTO तसेच ग्रामस्थ व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिरांदरम्यान वैयक्तिक व सार्वजनिक योजनांची माहिती देखील नागरिकांना देण्यात आली.
ग्रामविकासाकडे एक महत्त्वाचे पाऊल:
या शिबिरांमुळे अनेक कुटुंबांना रोजगार हमी योजनेंतर्गत थेट लाभ मिळाला आहे. ग्रामस्थांनी स्वयंपूर्ण रोजगाराच्या दिशेने पाऊल टाकले असून स्थलांतर कमी करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न अधिक गतीमान झाले आहेत. मनरेगा अंतर्गत अशी उपक्रमशीलता ग्रामीण विकासासाठी आणि आर्थिक स्वावलंबनासाठी एक सकारात्मक पाऊल ठरत आहे.
मनरेगा ही केवळ रोजगार योजना नसून ती ग्रामीण भागातील जीवनमान उंचावणारी एक क्रांती आहे – आणि आजच्या या शिबिरांनी त्याचेच प्रत्यंतर दिले आहे.

#MGNREGA#nandurbar#ruraldevelopment#Jobcard#employment#Grampanchayat#NandurbarUpdates#मनरेगा#ग्रामीणविकास