मुंबई: ‘महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी’ (अमृत) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘अमृत पर्यटन’ उपक्रमांतर्गत पर्यटन क्षेत्राशी संबंधित उद्योजक, व्यावसायिक व नवउद्योजकांसाठी उद्योजकता कौशल्य विकास कार्यक्रम (Entrepreneurship Development Programme – EDP) आयोजित करण्यात आला आहे. पर्यटन क्षेत्राशी संबंधित सर्व उद्योजक, व्यावसायिक तसेच इच्छुक युवक-युवतींनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी, स्थानिक रोजगार निर्मिती वाढविण्यासाठी तसेच पर्यटनाशी संबंधित उद्योजकांना सक्षम करण्याच्या उद्देशाने ‘अमृत पर्यटन’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील पर्यटन स्थळे, पर्यटन सेवा, स्थानिक उत्पादने आणि पर्यटन व्यवसायांना नव्या संधी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
पर्यटन क्षेत्र हे देशातील सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या क्षेत्रांपैकी एक असून, व्यवसाय विस्तार, रोजगारनिर्मिती आणि आर्थिक विकासाच्या दृष्टीने या क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध आहेत. या संधींचा लाभ अधिकाधिक उद्योजकांना मिळावा तसेच त्यांना आधुनिक व्यवसाय व्यवस्थापनाचे कौशल्य आत्मसात करता यावे, यासाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमात टूर अँड ट्रॅव्हल्स व्यावसायिक, पर्यटक मार्गदर्शक (टुरिस्ट गाईड्स), कुक अँड केटरर्स, होमस्टे व रिसॉर्ट संचालक, पर्यटन सेवा पुरवठादार, धार्मिक व सांस्कृतिक पर्यटनाशी संबंधित उद्योजक तसेच पर्यटन क्षेत्रात नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणारे युवक-युवती सहभागी होऊ शकतात. कार्यक्रमादरम्यान सहभागी उद्योजकांना व्यवसाय उभारणी व विस्तारासाठी आवश्यक मार्गदर्शन, प्रभावी व्यवसाय नियोजन, आधुनिक विपणन तंत्रज्ञान, डिजिटल मार्केटिंग, ग्राहक व्यवस्थापन, आर्थिक नियोजन, ब्रँडिंग, पर्यटन क्षेत्रातील नव्या व्यावसायिक संधी तसेच शासनाच्या विविध योजना आणि सहाय्य योजनांबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे. याशिवाय, पर्यटन क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ आणि यशस्वी उद्योजकांकडून प्रत्यक्ष अनुभवाधारित मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे सहभागी उद्योजकांना आपल्या व्यवसायाचा अधिक प्रभावी विकास करण्यासाठी आवश्यक दिशा आणि मार्गदर्शन मिळणार आहे.
अमृत पर्यटन उपक्रम हा पर्यटन क्षेत्रात स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देणे, नवउद्योजकांना सक्षम करणे आणि पर्यटन व्यवसाय अधिक व्यापक स्वरूपात विकसित करणे, या उद्देशाने सुरू करण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 9112228773 हा आहे.
