Home महाराष्ट्र प्रत्येक मुलीने ‘एचपीव्ही’ लसीकरणाचा लाभ घ्यावा : पालकमंत्री जयकुमार रावल

प्रत्येक मुलीने ‘एचपीव्ही’ लसीकरणाचा लाभ घ्यावा : पालकमंत्री जयकुमार रावल

Every girl should take advantage of HPV vaccination: Guardian Minister Jayakumar Rawal

धुळे: महिलांमधील गर्भाशयमुख कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी 14 वर्षे पूर्ण झालेल्या परंतु 15 वर्षे पूर्ण न झालेल्या जिल्ह्यातील प्रत्येक मुलीने एचपीव्ही लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.

जागतिक महिला दिनानिमित्त उपजिल्हा रुग्णालय, दोंडाईचा येथे आज सायंकाळी जिल्हास्तरीय ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहीमेचा शुभारंभ कार्यक्रम झाला. त्यावेळी पालकमंत्री श्री. रावल बोलत होते. या कार्यक्रमास उद्योगपती सरकारसाहेब रावल, नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष विजय पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्ता देगांवकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मनिष पवार, जिल्हा समाजकल्याण अधिकारी नितीन खंडेराय, वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्निल पाटील, अधीक्षक डॉ. भरत कुलकर्णी, डॉ. संजय मोरे, गट विकास अधिकारी रमेश नेतनराव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रुचिता पवार आदी उपस्थित होते.पालकमंत्री श्री. रावल म्हणाले की, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 फेब्रुवारी 2026 रोजी या मोहिमेची राष्ट्रीयस्तरावर सुरुवात केली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून प्रत्येक राज्याने आपल्या क्षेत्रात एचपीव्ही लसीकरण प्रभावीपणे राबवावे, असे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार राज्य शासनानेही ही मोहीम स्वीकारत जागतिक महिला दिनानिमित्त तिची सुरुवात केली असून साधारणतः 90 दिवस ही मोहीम चालणार आहे.

ते पुढे म्हणाले की, पूर्वी महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण तुलनेने कमी होते. सध्या महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. गर्भाशयमुख कर्करोगासारख्या आजारावर लसीकरणाच्या माध्यमातून 99 टक्क्यांपर्यंत प्रतिबंध घालता येऊ शकतो. आजार झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा ‘प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर’ या तत्त्वानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचाच एक भाग म्हणून जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने धुळे जिल्ह्यात एचपीव्ही लसीकरण मोहिमेची सुरुवात झाली आहे. पुढील 90 दिवसांत आशा वर्कर, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी, ग्रामसेवक, तलाठी, विविध सामाजिक संस्था तसेच महिला बचत गटांनी जिल्ह्यातील 14 ते 15 वर्ष वयोगटातील प्रत्येक मुलीपर्यंत पोहोचून त्यांना लसीकरणाचे महत्व समजावून जवळच्या शासकीय रुग्णालयात लसीकरणासाठी आणुन धुळे जिल्ह्यात सुरू झालेली ही मोहीम शंभर टक्के लाभार्थ्यांपर्यंत पोहचावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

पालकमंत्री श्री.रावल यांच्या हस्ते जागतिक महिला दिनानिमित्त सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या आरोग्य क्षेत्रातील कर्तृत्ववान महिला डॉक्टर्स, परिचारिका, आरोग्य सेविका, आशा सेविका यांचा प्रशस्तीपत्रक देवून सन्मान करण्यात आला.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देगांवकर यांनी एचपीव्ही  लसीकरणाबाबत माहिती दिली. प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बोडके यांनी तर सुत्रसंचलन आरोग्य सेवक अनिल भोई यांनी केले.

error: Content is protected !!
Exit mobile version