Home शैक्षणिक शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत

शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत

Everyone should come together and make efforts to provide quality education in schools.

शिक्षणमंत्री दादाजी भुसे

शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावा. आपल्या शाळेसाठीच नव्हे, तर संपूर्ण राज्यासाठी करण्याच्या भावनेने कर्तव्य करावे, असे आवाहन आज राज्याचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात शिक्षण विभागाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक झाली. त्यावेळी मंत्री श्री. भुसे बोलत होते. या बैठकीस साक्रीच्या आमदार मंजुळा गावित, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार यांच्यासह शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रवीण अहिरे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) वंदना वळवी, शिक्षणाधिकारी (योजना) उर्मिला पारधे, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था डॉ. राजेंद्र महाजन, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) नीलेश लोहकरे, अधिव्याख्याता, डाएट बाबासाहेब बढे, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ. युनूस पठाण, सर्व गटशिक्षणाधिकारी तसेच उपक्रमशील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीत सिंगापूरला अभ्यास दौऱ्यावर गेलेल्या आणि जिल्ह्यातील गुणवंत शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील गुणवत्ता वाढवण्यासाठी घेतलेल्या उपक्रमांची माहिती सादर केली.

मंत्री श्री. भुसे यांनी अधोरेखित केलेले मुद्दे

• हुशार विद्यार्थ्यांनीच इतर विद्यार्थ्यांना शिकवण्याचे उपक्रम घ्यावेत.

• गावातील सुशिक्षित युवकांनीही लहान मुलांना शिकवण्यासाठी पुढे यावे.

• घरातील आई-वडील, आजी-आजोबा यांनी रोज अर्धा तास मुलांशी संवाद साधावा व अभ्यासक्रम समजून घ्यावा.

• संपूर्ण वर्षभरात राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांचे वार्षिक शालेय कॅलेंडर तयार करण्यात येत आहे.

• एक आदर्श शाळा निवडून केंद्रस्तरावर विशेष योजना राबवली जाणार.

• उर्दू शिक्षकांसंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जाणार.

• स्पेशालिस्ट शिक्षकांचा अनुभव व ज्ञान संपूर्ण जिल्ह्यासाठी वापरला जाईल.

प्राथमिक सुविधा आणि इन्फ्रास्ट्रक्चरबाबत मंत्री महोदयांनी दिलेले निर्देश :

• प्रत्येक शाळेत स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी आणि उत्तम स्वच्छतागृह असावे.

• केंद्रप्रमुखांनी शाळांना नियमित भेटी द्याव्यात व अडचणींचे त्वरित निराकरण करावे.

• शिक्षकांनी मे महिन्यात पालकांशी संवाद साधावा आणि विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करावा.

• गणवेशासाठीची रक्कम शासनाकडून आगोदरच दिली जाईल, त्यामुळे गणवेश व भोजन हे दर्जेदार असले पाहिजे.

विद्यार्थ्यांसाठी नविन योजना :

• पुस्तकांबरोबरच इतर जीवनोपयोगी ज्ञान देण्याचा विचार.

• विद्यार्थिनींसाठी ‘पिंक रूम’ उपलब्ध करून देण्यात येणार.

• शालेय सायकल योजना सुरु करण्याचा विचार.

• शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांनी घरी उत्पादित भाजीपाला शाळेत विक्रीसाठी आणावा, असे उपक्रम राबवावेत.

• विद्यार्थ्यांची सहल विविध क्षेत्रात नेऊन त्यांना त्या क्षेत्राची माहिती दिली जावी.

शिक्षकांच्या सोयीसाठी उपाय :

• अशैक्षणिक कामांचे ओझे कमी करून शिक्षणाशी संबंधित कामांना प्राधान्य.

• गुणवंत शिक्षकांचे कार्य इतर शाळांनी देखील आत्मसात करावे.

• खेळात प्राविण्य असल्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय स्पर्धांसाठी पाठिंबा.

• शिक्षण हे पुण्याचे काम आहे आणि आपल्याला ही संधी मिळाली आहे, त्याचे सोनं करावे.

शेवटी मंत्री श्री. भुसे यांनी सर्व गुणवंत शिक्षकांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या.

0000000000

error: Content is protected !!
Exit mobile version