
दत्त जयंतीनिमित्त दरवर्षी सारंगखेडा येथे भरविण्यात येणाऱ्या यात्रेतील अश्वबाजारात साधारणपणे अडीच ते तीन हजार अश्व विक्रीसाठी दाखल होतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात येणाऱ्या अश्वांच्या आरोग्य, सुरक्षितता व देखभालीसाठी पशुसंवर्धन विभागामार्फत दरवर्षी आवश्यक पशुवैद्यकीय सेवा पुरविल्या जातात.
सारंगखेडा येथे झालेल्या बैठकीत मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी आणि मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद श्री. नमन गोयल यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार यंदाच्या यात्रेसाठी पशुसंवर्धन विभागाने विशेष तयारी केली आहे. त्यानुसार दिनांक ४ डिसेंबर २०२५ ते २६ डिसेंबर २०२५ या संपूर्ण यात्राकालावधीत पशुवैद्यकीय सेवा देण्यासाठी एकूण १३ पशुवैद्यकीय पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
प्रत्येक पथकाची दोन दिवसांसाठी नेमणूक करण्यात आली असून, प्रत्येक पथकात १ पशुधन विकास अधिकारी, १ सहाय्यक पशुधन विकास अधिकारी अथवा पशुधन पर्यवेक्षक आणि १ वर्णोपचारक अथवा परिचर यांचा समावेश आहे. या पथकांमार्फत आतापर्यंत एकूण १५० आजारी अश्वांवर औषधोपचार करण्यात आले असून, काही प्रकरणांमध्ये किरकोळ शस्त्रक्रियाही यशस्वीपणे पार पाडण्यात आल्या आहेत.
यासोबतच विविध स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या अश्वांची सखोल आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. अश्वांमध्ये आढळणाऱ्या ग्लॅंडर्स (Glanders) या गंभीर आजाराच्या प्रतिबंधासाठी सिरोमॉनिटरिंग तपासणी करण्यात येत असून, आतापर्यंत सुमारे ६०० अश्वांचे रक्तनमुने तपासणीसाठी संकलित करण्यात आले आहेत.
या सर्व उपाययोजनांमुळे यात्रेतील अश्वांचे आरोग्य सुरक्षित राहण्यास मदत होत असून, अश्वमालक, व्यापारी व यात्रेकरू यांना मोठा दिलासा मिळत आहे. पशुसंवर्धन विभागाच्या या नियोजनबद्ध व तत्पर सेवेमुळे सारंगखेडा दत्त जयंती यात्रेतील अश्वबाजार अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि यशस्वीपणे पार पडत आहे.
(Sarangkheda, ChetakFestival)
#Nandurbar#AnimalHealth#VeterinaryServices#Glanders#HorseFair