
वर्धा: सन 2026 हे वर्ष एल निनो प्रभावित असल्याने शेती पिकांवर होणारा परिणाम याबाबत शासनाच्यावतीने देण्यात येणा-या सुचना व उपाय योजनांचा अवलंब करुन शेती व्यवसाय करावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी कृषि दिन कार्यक्रमात केले.
हरितक्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्या सिंधुताई सपकाळ सभागृहात कृषि दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला जिल्हाधिका-यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अरविंद उपरीकर, कृषि विज्ञान केंद्राचे जिल्हा समन्वयक जिवन कातोरे, कृषि विकास अधिकारी शिवा जाधव, कृषि व्यवसाय संघटनेचे अध्यक्ष रवि शेंडे आदी उपस्थित होते.
शेतक-यांनी शेतीचा खर्च कमी करुन अधिक उत्पादन घेण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती करावी यासाठी युवा शेतक-यांनी पुढे यावे. सोबतच पिकामध्ये बदल करुन रेशीम उद्योग, अन्न प्रक्रिया उद्योग शेतक-यांनी सुरु करावे तसेच मुलस्थानी जलसंधारण अंतर्गत जलतारा प्रत्येक शेतक-यांनी आपल्या शेतात करणे आवश्यक असल्याचे पुढे बोलतांना वान्मथी सी म्हणाल्या.
शेती व्यवसाय ही आपली जीवनपध्दती आहे. हवामानातील बदल, बाजारातील अस्थिरता, जमिनीची कमी होणारी सुपिकता या बाबीचा विचार करुन शेतक-यांनी कृषिक्षेत्रामधील नाविण्यपुर्ण बाबीची माहिती घेऊन तसेच शेती पिकाबद्दल अभ्यास करुनाच शेती करावी म्हणजेच शेती करतांना अभ्यासपूर्ण शेती करणे गरजेचे आहे, असे पराग सोमण म्हणाले.
कार्यक्रमाप्रसंगी शेती मध्ये भरीव काम करणा-या तुर पिक स्पर्धेमध्ये जिल्हा स्तरावर प्राविण्य प्राप्त करणा-या शेतक-यांचा शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा कृषि क्रांती योजना अंतर्गत सिंचन विहिर पुर्ण केलेल्या लाभार्थींचा शाल श्रीफळ व धनादेश देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमानंतर मान्यवराचे हस्ते किटकनाशकांची फवारणी करतांना शेतक-यांनी घ्यावयाची काळजी या बाबीची जनजागृतीच्या चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन मनोज नागपूरकर, यांनी तर आभार संदिप ढोणे यांनी मानले.