
संबंधित यंत्रणांनी प्रकल्प पूर्णत्वातील अडचणी दूर कराव्यात. कंत्राटदाराला देण्यात आलेल्या कालावधीत प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे याकडे संबंधित यंत्रणांनी लक्ष द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथिगृह येथे आयोजित पायाभूत सुविधा मुख्यमंत्री वॉर रूम बैठकीत दिले. विलंबाने काम पूर्ण करणाऱ्या कंत्राटदारांना पुढील कुठलेही नवीन काम संबंधित यंत्रणेने देऊ नये, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
कुठल्याही परिस्थितीत पायाभूत सुविधांचा प्रकल्प हा तीन ते साडेतीन वर्षांमध्ये पूर्ण झाला पाहिजे, असे निर्देश देऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, निविदा प्रक्रिया राबवताना त्यामध्ये कंत्राटदाराने मागील प्रकल्प पूर्ण करण्यासाठी लावलेल्या कालावधीच्या निकषाचाही समावेश असावा. कंत्राटदारांनी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विलंब केल्यास देशाचे व पर्यायाने राज्याचे नुकसान होते. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत प्रकल्पाच्या पूर्णत्वामध्ये होणारा विलंब खपवून घेतला जाणार नाही. प्रकल्पाच्या पूर्णत्वामध्ये अनेक अडचणी असतात. मात्र यंत्रणांनी अडचणींवर मात करीत पुढे वाटचाल केली पाहिजे.
बैठकीस मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव (वित्त) विकासचंद्र रस्तोगी, अपर मुख्य सचिव (सार्वजनिक बांधकाम) मिलिंद म्हैसकर, अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे, प्रधान सचिव (कामगार) आय ए. कुंदन, प्रधान सचिव (पाणीपुरवठा व स्वच्छता) पराग जैन, प्रधान सचिव (विधि व न्याय) दिलीप घुमरे, सचिव (पर्यावरण) जयश्री भोज, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त संजय मुखर्जी, बृहन्मुंबई आयुक्त अश्विनी भिडे आदी उपस्थित होते.
सविस्तर वृत्त : https://mahasamvad.in/203023/