
‘वंदे मातरम्’ हा स्वातंत्र्यलढ्याचा परवलीचा शब्द होता आणि क्रांतिकारकांचे घोषवाक्यही याच गीतातून तयार झाले. विश्वाला मार्गदर्शन करणारा भारत घडवण्यासाठी राष्ट्रभक्ती आणि एकात्मता आवश्यक आहे. यासाठी ‘वंदे मातरम्’च्या सामूहिक गायनाने संकल्प करूया, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामूहिक वंदे मातरम् गीत गायनप्रसंगी केले.
‘वंदे मातरम्’ गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मंत्रालयात आयोजित सामूहिक ‘वंदे मातरम्’ गायनाच्या कार्यक्रमास सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव राजेश कुमार, पद्मश्री पद्मजा फेणानी-जोगळेकर यांच्यासह मंत्रालयातील वरिष्ठ सनदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांनी एकत्र येऊन ‘वंदे मातरम्’चे गायन करत राष्ट्रभावना दृढ करण्याचा संकल्प व्यक्त केला.
‘वंदे मातरम्’ गीताचे संपूर्ण देशभर गायन होत आहे. या गीताने स्फुरण येते. शब्द, गीत, प्रेरणा म्हणजेच वंदे मातरम् आहे. हे स्वातंत्र्य गीत, आत्मिक प्रेरणा गीत असून क्रांतीकारकांनाही प्रेरणा देणारे समर गीत आहे. सर्व धर्म, जाती, पंथ येऊन गीत गातात, यातून एकत्रित जगण्याची प्रेरणा मिळते. जगाला हेवा वाटावा असे एकमेव गीत असल्याचे प्रतिपादन मंत्री आशिष शेलार यांनी प्रास्ताविकात केले.