Home महाराष्ट्र ‘गणेशोत्सव – आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ चित्ररथाला देशात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान

‘गणेशोत्सव – आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ चित्ररथाला देशात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान

‘Ganeshotsav - A Symbol of Self-Reliance’ Chitrarath awarded first prize in the country

नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिन 2026 च्या निमित्ताने कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या संस्कृतीचे आणि परंपरेचे दिमाखदार दर्शन घडवणाऱ्या ‘गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ या चित्ररथाला केंद्र सरकारचा प्रथम क्रमांकाचा मानाचा पुरस्कार केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय शेठ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संकल्पनेतून साकारलेल्या या चित्ररथाने आपल्या कल्पक सादरीकरणाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. नवी दिल्लीतील ‘राष्ट्रीय रंगशाळा कॅम्प ‘ मध्ये संरक्षण मंत्रालयाच्या वतीने आयोजित विशेष समारंभात राज्याच्या वतीने सांस्कृतिक कार्य विभागाचे सहायक संचालक श्रीराम पांडे, कार्यक्रमाधिकारी निलेश धुमाळ आणि चित्ररथ साकारणारे मुख्य कलाकार तुषार प्रधान, रोशन इंगोले, कृष्णा सालवटकर, श्रीपाद भोंगाडे, चंद्रकांत पाटील व पंकज इंगळे यांनी हा करंडक आणि सन्मानपत्र स्वीकारले.

यंदाच्या प्रजासत्ताक दिन संचलनात देशभरातील 17 राज्ये आणि 13 केंद्र सरकारच्या विभागांचे असे एकूण 30 चित्ररथ सहभागी झाले होते. यामध्ये ‘वंदे मातरम्’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ ही मुख्य संकल्पना (थीम) ठेवण्यात आली होती. या चुरशीच्या स्पर्धेत महाराष्ट्राने आपल्या कल्पक सादरीकरणाने तज्ज्ञ समिती आणि लोकपसंती अशा दोन्ही स्तरांवर बाजी मारली. या स्पर्धेत जम्मू-काश्मीरच्या चित्ररथाला द्वितीय, तर केरळच्या चित्ररथाला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. सादरीकरणातील नावीन्य, सामाजिक संदेश आणि दृश्यात्मक आकर्षण या सर्व निकषांवर महाराष्ट्राचा चित्ररथ देशात सर्वोत्कृष्ट ठरला आहे.

या विजयात सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली. चित्ररथाची मूळ संकल्पना आणि संचलनादरम्यान सादर करण्यात आलेले श्री गणेशाचे गाणे विभीषण चवरे यांनी स्वतः तयार केले होते. त्यांच्या कल्पकतेतून उतरलेले हे गीत आणि चित्ररथाची मांडणी यामुळे महाराष्ट्राच्या सादरीकरणाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली.

महाराष्ट्राच्या चित्ररथाचा विषय केवळ धार्मिक नसून तो आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणावर आधारित होता. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवातून झालेली समाजजागृती, अष्टविनायकांच्या विलोभनीय प्रतिकृती आणि शाडूच्या मातीपासून तयार होणाऱ्या पर्यावरणपूरक मूर्तींच्या माध्यमातून निर्माण होणारी नवी अर्थव्यवस्था या चित्ररथात प्रभावीपणे दाखवण्यात आली होती. विशेषतः गणेशोत्सवामुळे मूर्तिकार, सजावटकार आणि ढोल-ताशा पथकांतील कलाकारांना मिळणारा रोजगार आणि त्यातून साध्य होणारी ‘आत्मनिर्भरता’ हा संदेश केंद्रस्थानी ठेवण्यात आला होता. चित्ररथासोबत सहभागी झालेल्या लेझीम पथक आणि ढोल-ताशांच्या निनादाने संपूर्ण कर्तव्यपथ दणाणून सोडला होता, ज्याची दखल संपूर्ण देशाने घेतली.

error: Content is protected !!
Exit mobile version