Home महाराष्ट्र महाराष्ट्राच्या विकासाचे प्रवेशद्वार गोंदिया जिल्हा : वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे

महाराष्ट्राच्या विकासाचे प्रवेशद्वार गोंदिया जिल्हा : वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे

Gondia district is the gateway to Maharashtra's development: Textile Minister Sanjay Savkare

गोंदिया : महाराष्ट्राच्या विकासाचे प्रवेशद्वार गोंदिया जिल्हा असून जिल्ह्यात विपुल प्रमाणात वनसंपदा आहे. या जिल्ह्यात पर्यटन विकासाच्या अनेक संधी असल्याचे प्रतिपादन राज्याचे वस्त्रद्योग मंत्री संजय सावकारे यांनी आज शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात केले.

महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनाचा शासकीय सोहळा पोलीस मुख्यालय मैदान, कारंजा येथे आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी श्री. सावकारे बोलत होते. या मुख्य शासकीय कार्यक्रमात आमदार विनोद अग्रवाल, जिल्हाधिकारी डॉ.मंगेश गोंदावले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, पोलीस अधीक्षक गोरख भामरे, भारतीय वन सेवेचे अधिकारी पवन कुमार जोंग, यासह सर्व विभागाचे विभाग प्रमुख व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी श्री. सावकारे यांनी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या देशभक्तांना अभिवादन केले. महाराष्ट्र संतांची, शूरवीरांची, समाजसुधारकांची भूमी असल्याने महाराष्ट्र देशात पुरोगामी म्हणून ओळखला जातो. याप्रसंगी त्यांनी नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देऊन नागरिकांना विकसित महाराष्ट्र करण्यासाठी आपला सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र अर्थव्यवस्थेत नक्कीच चांगली कामगिरी करीत असून भविष्यातही करणार असल्याचे म्हणाले.

श्री. सावकारे पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत गोंदिया येथे तालुकास्तरीय समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील ३०९४०  विविध शासकीय लाभांचे प्रत्यक्ष वाटप करण्यात आले. उर्वरित टप्प्यातील शिबिरे होणार असून नागरिकांनी त्याचा अवश्य लाभ घ्यावा, असे ते यावेळी म्हणाले.

गतिमान प्रशासन योजनेअंतर्गत जिल्ह्यामध्ये नवीन २५ तलाठी कार्यालय बांधण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्यामार्फत निधी देण्यात आला असून यामुळे तलाठी साजामध्ये कामकाजाला वेग येईल आणि नागरिकांना त्यांच्या सेवा तात्काळ उपलब्ध करून देण्यात मदत होईल, असे यावेळी नागरिकांना आश्वस्थ केले.

भारतात जनगणना सुरू झाली असून जनगणनेमुळे लोकसंख्येची आकडेवारी कळते. अर्थव्यवस्था, साक्षरता, शिक्षण, निवास, घरगुती सुविधा, शहरीकरण, प्रजनन दर, अनुसूचित जाती व जमातीची लोकसंख्या, भाषा, धर्म, स्थलांतर, दिव्यांगत्व इत्यादी माहिती प्राप्त करण्याचा हा विश्वासार्ह स्रोत आहे. जनगणना ही नागरिकांचे लाभासाठी विविध कल्याणकारी योजनांचे नियोजन करण्याकरिता अतिशय महत्त्वाची पायाभूत माहिती उपलब्ध करून देणारे व प्रत्यक्षात राष्ट्र निर्माणाच्या व्यापक कामाचा महत्त्वाचा भाग आहे. जनगणनेची नोंद व माहिती ही पूर्णपणे गोपनीय राहते. तरी आपण सर्वांनी जनगणना २०२७ च्या राष्ट्रीय कार्याला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी मंचावरून केले.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडून ज्ञानभारतम् हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्या अंतर्गत ७५ वर्ष पूर्वीचा अभिलेख हस्तलिखित यांचा जतन करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभेमध्ये हा विषय मांडणे बाबत सूचित करण्यात आलेले आहे. सर्व संबंधित तलाठी, ग्रामसेवक व अन्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने घरोघरी जाऊन याबाबत विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत व भारताच्या संस्कृतीचे जतन करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे, असे सांगून जिल्हयातील नागरिकांकडे असणारा हस्तलिखित वारसा उपलब्ध करून दिल्यास भविष्यातील पिढीला तो कळेल, असे ते याप्रसंगी म्हणाले.

जिल्ह्यातील आरोग्य विभाग चांगली कामगिरी करीत असून राज्यस्तरीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार जिल्ह्यातील कवलेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि देवरी ग्रामीण रुग्णालयाला मिळालेला आहे. राज्यात राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम राबविण्यात येत असून गोंदिया जिल्ह्याला द्वितीय मानांकनामुळे क्षयरोग विभागास महाआरोग्य सन्मान २०२६ पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याचा त्यांनी उल्लेख केला.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाचा नागपूर ते गोंदिया विस्तार करण्यात येणार आहे. तसेच गोंदिया ते बल्लारशाह व गोंदिया ते जबलपूर या रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण होणार असल्यामुळे गोंदिया जिल्ह्याच्या विकासाला गती प्राप्त होणार आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

श्री. सावकारे पुढे म्हणाले, रस्ते हे विकासाचे महामार्ग असतात. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून वर्ष २०२४-२५ मध्ये भाग २ अंतर्गत गोंदिया जिल्ह्याला १२२.४८ कि.मी. लांबीचे २७ रस्ते मंजूर करण्यात आले असून त्यातील १५ कामे पूर्ण झालेली आहेत. उर्वरित १२ कामे जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे आणि ही कामे विहीत वेळेत पूर्ण होतील असा विश्वास व्यक्त केला.

यासह त्यांनी सहकार विभागामार्फत राज्यातील प्राथमिक कृषी पत पुरवठा सहकारी संस्थांचे संगणकीकरण करण्यात येणार असल्याचे सांगून गोंदिया जिल्ह्यातील ३२९ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थापैकी १२१ सहकारी संस्थांचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती दिली. जिल्ह्यातील नागरिकांना ऑनलाईन सुविधा पुरविण्याकरिता १२७ सेवा सहकारी संस्थांकडे सी.एस.सी. सेंटरचे कामकाज प्रत्यक्षात सुरु झालेले आहेत, असेही सांगितले.

ते पुढे म्हणाले, आदिवासी विकास मंडळामार्फत आणि उर्वरित भागात मार्केटिंग फेडरेशनद्वारे वर्ष २०२५-२६ मध्ये ३१ मार्च २०२६ पर्यंत एकूण एक लाख ७५ हजार ५२ शेतकऱ्यांकडून ३३.६७ लक्ष क्विंटल धान खरेदी करण्यात आले आहे.१७ एप्रिल २०२६ पर्यंत आदिवासी विकास महामंडळामार्फत आणि मार्केटिंग फेडरेशनमार्फत जिल्ह्यात एकूण एक लाख ६ हजार ९८ धान उत्पादक शेतकऱ्यांना ७८६.८९ कोटी रुपये रक्कम अदा करण्यात आली आहे. रब्बी हंगामात धान व मका लागवड केलेल्या शेतकऱ्यांची खरेदीकरिता ऑनलाईन नोंदणी सुरू झाली असून शेतकऱ्यांनी नोंदणी करून घ्यावी, असे ते यावेळी म्हणाले.

राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर ‘नमो शेतकरी महासन्माननिधी’ ही योजना राज्य शासन राबवित असून प्रतिवर्षी सहा हजार रुपयाप्रमाणे शेतकऱ्यांना वितरित करण्यात येते. या आर्थिक वर्षात नमो शेतकरी महासन्माननिधी योजनेअंतर्गत दुसऱ्या हप्त्यात ८५ कोटी ८९ लाख ५४ हजार रुपये वितरित करण्यात आलेले आहेत. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १०१ लाभार्थी शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान वितरित करण्यात आले असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभाग चांगले काम करीत असून अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ (सुधारित अधिनियम २०१५) अंतर्गत कुटुंबातील एका पात्र वारसदारास शासनाच्या आस्थापनेवर घेण्यात येते. याअंतर्गत जिल्ह्यातील ०८ वारसदारांना नुकतेच नियुक्ती आदेश वाटप करण्यात आले आहे. यामुळे त्या कुटुंबातील लोकांना आर्थिक आधार मिळालेला आहे असून यापुढे मुख्य प्रवाहात येऊन चांगल्या पद्धतीने जीवन जगतील अशा सदिच्छा दिल्या.

२०२६-२७ या वर्षामध्ये जास्तीत जास्त मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कामांच्या नियोजनाचे आराखडा तयार करण्यात आलेला आहे. त्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये कामे सुरू करण्यात आलेली असून जास्तीत जास्त कुटुंबांना १०० दिवस रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत रोजगार हमी योजनेअंतर्गत प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

गोंदिया जिल्हा हा शेततळ्यांचा जिल्हा आहे. या शेततळ्यांमध्ये मत्स्यपालन मोठ्या प्रमाणात केले जाते, त्यातुन आर्थिक उत्पन्नही होत असते. शासनाच्या विविध योजनांचा लाभ मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांना दिला जातो. विविध शासकीय योजनांशी जोडण्यासाठी राष्ट्रीय मत्स्य व्यवसाय डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आलेले आहे, यात जिल्ह्यात ८२७१ नोंदणी करण्यात आल्या असून या सर्व नोंदणी शासनाने मंजूर केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा पोलीस दल उत्कृष्ट काम करीत आहे. केंद्र सरकारच्या गृह खात्याने ३१ मार्च २०२६ पर्यंत संपूर्ण देशातून नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले होते. जिल्ह्यात पोलिसांच्या प्रभावी उपाययोजनेमुळे १६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. पूर्वाश्रमीचे नक्षलवादी आता नवीन संवैधानिक आयुष्याला सुरुवात करीत आहेत. पूर्वाश्रमीच्या नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण प्रमाणपत्र बहाल करून त्यांच्यासाठी केंद्र आणि राज्य शासनामार्फत राबवलेल्या योजनांचा लाभ दिला जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

जिल्ह्यातील अतिदुर्गम परिसरात विविध उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी पूर्ण करण्याच्या उद्देशाने – पोलीस दादालोरा खिडकी योजनेंतर्गत ‘एक हात मदतीचा’ हा स्तुत्य उपक्रम राबविला जात आहे. या वर्षभरात १३ योजनांचा लाभ ९८०७ नागरिकांना मिळवून दिला आहे, तर आतापर्यंत २२ उपक्रमांतर्गत ४४४७६ लाभार्थ्यांना शासनाच्या विविध कागदपत्रांचा लाभ मिळवून देण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

यासोबतच जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागामार्फत सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय व लोककल्याणकारी योजनांची योग्यरित्या अंमलबजावणी करण्यात येत आहे. या वर्षापासून २८ एप्रिल हा दिवस लोकसेवा हक्क दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती मंजुश्री देशपांडे यांनी केले.

क्षणचित्रे :

  • प्रारंभीवस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली व परेडचे निरीक्षण केले.
  • जिल्ह्याची निर्मिती १  मे १९९९ ला आजच झाली असून, यानिमित्ताने महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या व कामगार दिनाच्या तसेच आज बुध्द पौर्णिमा असल्याने नागरिकांना श्री. सावकारे यांनी शुभेच्छा दिल्या.
  • पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल देवरी येथील उपविभागीय पोलीस अधिकारीविवेक पाटील, सर्वश्री पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर, पवनप्रसाद मिश्रा, नक्षलसेलचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत हत्तीमारे, सहायक पोलीस निरीक्षक संजय नाईक, सर्वश्री पोलीस हवालदार लियानार्ड मार्टीन, प्रकाश गायधने, अनिल कोरे, सर्वश्री पोलीस शिपाई भाष्कर हरिणखेडे, अतुल कोल्हाटकर यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून सत्कार.
  • महसूल विभागात उत्कृष्ट कार्याबद्दल तहसिल कार्यालय गोंदिया तलाठी रश्मी पारधी यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून सत्कार.
  • पथसंचलनात महाराष्ट्र राखीव बटालीयन पोलीस पथक, पुरुष पोलीस पथक, महिला पोलीस पथक, पुरुष होमगार्ड पथक, महिला होमगार्ड पथक, पोलीस बॅन्ड पथक, श्वान पथक, रुग्णवाहिका पथक व अग्नीशमन दल आदींचा समावेश होता.
  • पूर्वाश्रमीचे नक्षलवादी महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिन सोहळ्यात उपस्थित होते.
error: Content is protected !!
Exit mobile version