Home महाराष्ट्र Maratha Morcha: मराठा आंदोलकांवरील लाठीमाराची अपर पोलीस महासंचालकांमार्फत चौकशी

Maratha Morcha: मराठा आंदोलकांवरील लाठीमाराची अपर पोलीस महासंचालकांमार्फत चौकशी

Maratha Morcha

(बुलढाणा) जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी असून या घटनेनंतर जालना पोलीस अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल आणि कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

चौकशी अहवालानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जालना येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून झालेल्या लाठीमाराचा संदर्भ देऊन आज बुलढाणा येथे आयोजित ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी कारवाईबाबत घोषणा केली. या घटनेनंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. जिल्हा पोलीस अधिक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे निर्देश देण्यात आले असून अपर पोलीस अधिक्षक आणि उपअधीक्षकांची जिल्ह्याबाहेर बदली करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणाची अपर पोलीस महासंचालक (कायदा-सुव्यवस्था) संजय सक्सेना यांच्यामार्फत चौकशी करण्यात येईल, चौकशी अहवालानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, शासन कुणालाही पाठीशी घालणार नाही, आवश्यकता भासल्यास या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल. (Latest Nandurbar News)

Maratha Kranti Morcha

मराठा समाजाच्या वेदनांची मला पूर्ण जाण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सर्वसामान्य मराठा कुटुंबात जन्मलेला मी देखील एक असून मराठा समाजाच्या वेदनांची मला पूर्ण जाण आहे. मराठा समाजाला टिकेल असे आरक्षण मिळावे यासाठी शासन पूर्णपणे प्रयत्नशील असून त्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच त्याबद्दल सकारात्मक निर्णय होईल असे त्यांनी सांगितले. मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर नोकरीपासून वंचित राहिलेल्या साडेतीन हजार मराठा तरुणांना न्याय देण्यासाठी अधिसंख्य पदे भरण्याचा निर्णय आम्ही घेतला. (Latest Nandurbar News)

जालना येथे आंदोलन करणारे मनोज जरांडे पाटील यांच्याशी या घटनेच्या तीन दिवसांपूर्वी चर्चा झाली होती. त्यांच्या जीवाला धोका होऊ नये यासाठी त्यांनी उपोषण मागे घ्यावे असे आवाहन मी त्यांना केले होते. त्याना अपेक्षित असलेला निर्णय घेण्यासाठी शासन स्तरावर अधिकारी प्रयत्नशील होते. मात्र त्यापूर्वीच ही घटना घडल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले. मराठा समाज हा अत्यंत संवेदनशील पण तितकाच संयमी आहे. यापूर्वी लाखालाखांचे मोर्चे काढताना या समाजाने कधीही आपला संयम ढळू दिला नव्हता, त्यामुळे यापुढे देखील त्यांनी संयम बाळगावा, असे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केले. (Latest Nandurbar News)

error: Content is protected !!
Exit mobile version