वयाच्या 18 व्या वर्षापर्यंत 1 लाख 1 हजाराचे सहाय्य
5 हजार 376 लाभार्थ्यांना 2 कोटी 68 लाखाचे वितरण
वर्धा : मुलींचा जन्मदर वाढविण्यासोबतच त्यांच्या शिक्षणास चालना देणे, मृत्युदर कमी करून बालविवाह रोखणे तसेच कुपोषण कमी करणे व शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शुन्यावर आणण्याठी लेक लाडकी योजना सुरु करण्यात आली आहे. योजनेंतर्गत मुलीच्या जन्मापासून तर तिच्या 18 व्या वर्षापर्यंत टप्प्याटप्प्याने तिला 1 लाख 1 हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते. जिल्ह्यात योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत 2 कोटीहून अधिकचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे.
मुलींचा जन्मदर वाढण्यासह त्यांना शिक्षण देऊन सक्षम करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. परंतु समाजात आजही विशेषत: ग्रामीण भागात अनेकांना मुलगी म्हणजे ओझे वाटते. मुलींच्या शिक्षणाकडेही दुर्लक्ष केले जाते. ही बाब मुलींचा जन्मदर घटण्यास आणि त्या अशिक्षित राहण्यास कारणीभूत ठरणारी आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने लेक लाडकी योजना सुरु केली आहे.
योजनेमध्ये पात्र कुटूंबात मुलीचा जन्म झाल्यानंतर जन्मानंतर लगेच 5 हजार रुपये देण्याची तरतुद आहे. याशिवाय मुलगी इयत्ता पहिलीत गेल्यावर 6 हजार रुपये, सहावीत गेल्यावर 7 हजार रुपये, अकरावीत 8 हजार रुपये व वयाची 18 वर्षे पुर्ण केल्यानंतर 75 हजार रुपये याप्रमाणे एकुण 1 लाख 1 हजार रुपये एवढी रक्कम देण्यात येते.
योजनेमध्ये पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना त्याचप्रमाणे एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला योजनेचा लाभ दिला जातो. पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. दुसऱ्या प्रसुतीच्यावेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना योजेचा लाभ अनुज्ञेय आहे. मात्र त्यानंतर माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचा जन्माचा दाखला, कुटूंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, लाभार्थ्यांचे आधारकार्ड, पालकांचे आधारकार्ड, बँकेचे पासबुक, रेशनकार्ड पिवळे अथवा केसरी, शाळेचा दाखला, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहे.
5376 मुलींना 2 कोटी 68 लाखाचे सहाय्य
या योजनेंतर्गत जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 5 हजार 376 मुलींना पहिला टप्पा प्रत्येकी 5 हजार याप्रमाणे अर्थसहाय्य देण्यात आले आहे. ही रक्कम 2 कोटी 68 लाख 80 हजार इतकी आहे. त्यात आर्वी तालुक्यातील 484 मुलींचा समावेश आहे. आष्टी तालुका 257 मुली, देवळी तालुका 478 मुली, हिंगणघाट 500 मुली, कारंजा तालुका 352 मुली, समुद्रपुर तालुका 404 मुली, सेलु तालुका 528 मुली तर वर्धा तालुक्यातील 485 मुलींचा समावेश आहे. मदतीची रक्कम थेट आधारलिंक बॅंक खात्यात वितरीत केली जाते.
