Home आरोग्य जिल्ह्यात ‘कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र’ अभियानाचा शुभारंभ

जिल्ह्यात ‘कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र’ अभियानाचा शुभारंभ

'Leprosy-free, safe Maharashtra' campaign launched in the district

अमरावती: कुष्ठरोग हा शाप नसून तो एक उपचारसाध्य आजार आहे, हा संदेश जनमानसांत रुजवण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांच्या उपस्थितीत ‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती आणि ‘कुसुम’ कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र अभियानाचे जिल्हास्तरीय उद्घाटन करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र अंजनगाव बारी (ता. अमरावती) येथे नुकताच हा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कुष्ठरोग निवारणाची सामुहिक शपथ घेतली.

श्रीमती महापात्र यांनी स्वतः अंजनगाव बारी परिसरातील वीटभट्ट्यांवर जाऊन तेथील कामगारांशी संवाद साधला. त्यांनी तपासणीसह कुष्ठरोगाची लक्षणे ओळखण्याबाबत कामगारांचे समुपदेशन केले. कुष्ठरुग्णांना समाजात सन्मानाचे स्थान मिळावे आणि त्यांच्याबद्दलची अंधश्रद्धा दूर व्हावी, हा या ‘स्पर्श’ अभियानाचा मुख्य उद्देश आहे. 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी या पंधरवड्यामध्ये जिल्हाभरात विविध उपक्रम राबवून या आजाराविषयी शास्त्रोक्त माहितीचा प्रसार केला जाणार आहे.

या आजारावरील’बहुविध औषधोपचार’ सर्व शासकीय रुग्णालयांत मोफत उपलब्ध आहे. वेळेवर उपचार घेतल्यास कुष्ठरोगामुळे येणारी शारीरिक विकृती पूर्णपणे टाळता येते. कुष्ठरुग्णांना संविधानाने दिलेला समानतेचा अधिकार मिळवून देणे आणि त्यांना मुख्य प्रवाहात सामील करून घेणे हे समाजाचे कर्तव्य आहे. या कार्यक्रमाला सहायक संचालक डॉ. पूनम मोहोकार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा निंबाळकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. रिकुंजय केचे, डॉ. रसिका धर्मे व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. ‘भेदभाव समाप्त करूया, सन्मानाची वागणूक देऊया’ असे आवाहन कीत हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version