
पायाभूत सुविधांसाठी https://mhuid.mrsac.org.in या पोर्टलवरून युनिकआयडी क्रमांक प्राप्त करता येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यातील पायाभूत विकास कामांचे सुयोग्य नियोजन व्हावे, सुसूत्रता यावी, सर्व भागांचा समतोल विकास व्हावा व अनावश्यक खर्चात बचत व्हावी, यासाठी नियोजन विभागामार्फत MARS प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
या प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी MHUID प्रणालीवर आधारित iGOT कर्मयोगी प्लॅटफॉर्मवर विशेष प्रशिक्षण मॉड्यूल उपलब्ध करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण मॉड्यूल राज्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना MHUID पोर्टलचा योग्य वापर, GIS-आधारित मॅपिंग, प्रकल्प नोंदणी, अद्ययावत माहिती भरणे तसेच अहवाल सादर करणे यासाठी उपयुक्त आहे.
राज्यातील सर्व सार्वजनिक पायाभूत सुविधा प्रकल्पांची एकमेव व प्रमाणित नोंदणी हे MHUID प्रणालीचे उद्दिष्ट आहे. या प्रणालीमुळे नियोजन, प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी, अंमलबजावणी, देखभाल व पुनर्बांधणी या सर्व टप्प्यांचे रिअल-टाईम निरीक्षण करता येणार आहे. पीएम गतीशक्ती (PM GatiShakti) पोर्टलशी सुसंगतता राखून प्रकल्पांचे डुप्लिकेशन टाळणे, संसाधनांचा कार्यक्षम वापर व डेटा आधारित निर्णय प्रक्रिया राबविण्यासाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे.