Home महाराष्ट्र भिवंडीत राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; १ कोटी ९० लाखांचा मुद्देमाल जप्त

भिवंडीत राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; १ कोटी ९० लाखांचा मुद्देमाल जप्त

0
Major crackdown by the State Excise Department in Bhiwandi; contraband worth ₹1.90 crore seized.

मुंबई: परराज्यातून होणाऱ्या अवैध मद्य वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक मोहीम राबवून मोठी कारवाई केली आहे. भिवंडी येथील मुंबई – नाशिक हायवेवरील वडपे गावच्या कमानीसमोर सापळा रचून तब्बल १ कोटी ९० लाख ३५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये गोवा राज्यात विक्रीसाठी असलेल्या विदेशी मद्याचा साठा आणि एक ६ चाकी कंटेनर ट्रक समाविष्ट आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या माहितीनुसार, गोवा राज्यातून बेकायदेशीररित्या विदेशी मद्याची वाहतूक केली जात होती. त्यानुसार भिवंडी विभाग ठाणे-२ च्या पथकाने वडपे गावाजवळ पाळत ठेवून संशयित अशोक लेलँड ६ चाकी कंटेनर (क्रमांक HR-61 F-1508) थांबवला. वाहनाची झडती घेतली असता, त्यात गोव्यातील नामांकित मद्याच्या तब्बल ७७,७६० सीलबंद बाटल्या (१,६२० बॉक्स) आढळून आल्या. याबाबत हनुमान मोबता राम (वय २८ वर्षे, रा. पिरु का तला, सेदवा, बाडमेर, राजस्थान) याला अटक करण्यात आली आहे.

जप्त केलेल्या मुद्देमालमध्ये विदेशी मद्याच्या ७७,७६० सीलबंद बाटल्या त्याची किंमत १ कोटी ६३ लाख २९ हजार ६०० रुपये, अशोक लेलँड कंपनीचे ६ चाकी कंटेनर किंमत २७ लाख रुपये आणि एक मोबाईल त्याची किंमत किंमत ६ हजार रुपये यांचा समावेश आहे.

ही यशस्वी कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, सह आयुक्त (अंमलबजावणी व दक्षता) प्रसाद सुर्वे, कोकण विभागाचे विभागीय उप आयुक्त प्रदीप पवार आणि ठाणे-२ चे अधीक्षक उत्तम शिंदे, उपअधीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या पथकात भिवंडी विभागाचे निरीक्षक सुभाष एस. खंडेराय, दिपक परब, तसेच दुय्यम निरीक्षक संजय वाकचौरे, आप्पा चव्हाण, सहाय्यक दुय्यम निरीक्षक अर्जुन कापडे आणि जवान सर्वश्री नारायण जानकर, गणेश पाटील, सचिन पवार, निलेश तायडे, व स्वरुपा भोसले यांचा समावेश होता. या गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक सुभाष खंडेराय करीत आहेत.

नागरिकांना जाहीर आवाहन

राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपल्या परिसरात अशा प्रकारे अवैध व बेकायदेशीर मद्याची निर्मिती किंवा वाहतूक होत असल्यास तात्काळ टोल फ्री  १८००२३३९९९९ वर अथवा लँडलाईन क्रमांक ०२२-२०८२२४८८ वर संपर्क साधून माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गुप्त ठेवण्यात येईल.